विद्यार्थ्यांचा मनुष्य चलीत चवळी पेरणी यंत्राचा आविष्कार

0

जळगाव ;– येथील डॉ. उल्हास पाटील कृषी व तांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनुष्य चलीत चवळी पेरणी यंत्र निर्मीत करून कृषी क्षेत्रात नवा आविष्कार केला आहे.

कमी खर्चात शेती करणे अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर व्हावे या अनुषंगाने डॉ. उल्हास पाटील कृषी व तांत्रिकी महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थी निशिकांत पाटील, अखिलेश आणि कमलकांत सुर्यवंशी यांनी संशोधन करून चवळी पेरणी यंत्र व आंतरमशागत यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टरशिवाय चालणारे हे यंत्र एक किंवा दोन व्यक्तीही हाताळु शकतात. या यंत्राच्या सहाय्याने पेरणी आणि आंतरमशागतही करता येते. एकाच वेळी दोन ओळीत पेरणी करता येत असुन यंत्राला असलेल्या बियाणे टाकीची क्षमता तीन किलोपर्यंत आहे.

रोटरद्वारे बियाणे टाकीला जोडण्यात आले असुन एक्सलच्या सहाय्याने चालविल्यानंतर रोटर फिरून फिडींग यंत्राद्वारे बियाणे योग्य त्या अंतरावर पडतात. पेरणी यंत्रासोबत तण नियंत्रणासाठी अवजार तसेच बियाणे पेरणीनंतर माती झाकण्याचे छोटे अवजार या यंत्राला जोडता येते. या यंत्राची शेतात तपासणी केल्यावर त्यात प्रति हेक्टरसाठी लागणारे बी हे. १०.६६ किग्रॅ., बीची खोली ४.६ सेमी, आणि शेतीची कार्यक्षमता ६४.०९ प्रतिशत एवढी काढण्यात आली. हे यंत्र अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आले आहे. या संशोधनासाठी प्राचार्य ए.पी.चौधरी, सहाय्यक कुलसचिव अतुल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. या नव्या आविष्काराबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. एस.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.