वाळूने भरलेल्या ट्रकची ट्रॅक्टरला धडक : एकाचा मृत्यू

0

जळगाव, दि.7 –
भडगाव-वरखेड रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिराजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. अपघातात ट्रॅक्टरवर बसलेल्या मजूराचा मृत्यू झाला तर चालकाने पळ काढला.
भडगाव तालुक्यातील तळवण तांडा येथे नामदेव उखा चव्हाण वय-40 हा मजूर परिवारासह राहतो. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तो ट्रॅक्टर क्रमांक एमएच.19.एपी.8342 ने मालकाच्या शेतात जात होते.वरखेड-भडगाव रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिराजवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच.20.डीइ.5946 ने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. अपघातामुळे ट्रॅक्टर आणि ट्रक दोघे रस्त्याच्या कडेला पडले.
एकाचा मृत्यू, चालक जखमी
ट्रॅक्टरवर बसलेल्या नामदेव चव्हाण यांच्या पोटाला अपघातात जोरदार मार लागला. त्यामुळे त्यांना दुपारी 2 वाजता उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाला मार लागल्याने त्यांच्या शरीरात रक्त जमा झाले होते. सायंकाळी 5 वाजता त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर धडक देणार्‍या ट्रकचा चालक शेख मुख्तार अब्बास याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रकमध्ये होती वाळू
दरम्यान, धडक देणार्‍या ट्रकमध्ये वाळू भरलेली होती. अपघात झाल्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पडल्यावर वाळू शेतात पसरली होती. वाळूमाफियांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत असतानाही महसूल विभाग मूग गिळून गप्प आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.