योग्य दिशेने जाणारा पण संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक 

0
जळगाव ः यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे योग्य दिशेने जाणारा पण संभ्रमात टाकणारा, पूर्णत्वाला न जाणारा अर्थसंकल्प असल्याचे अर्थतज्ञ व प्रसिद्ध वक्ते चंदशेखर टिळक (डोंबविली) यांनी प्रतिपाद केले.
दि जळगाव पीपल्स मल्टीस्टेट शेड्युल बँक व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.6 रोजी गंधे सभागृहात आयोजित ‘अर्थसंकल्प 2016-अर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष श्रीधर इनामदार, सचिव विनित जोशी आदि मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना टिळक यांनी मोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प देखील अर्थसंकल्पापूर्वीच सर्व घोषणा करायच्या आणि अर्थसंकल्प केवळ नियमित पद्धतीने सादर करायचा अशा पारंपारिक शैलीतीलच असल्याचे सांगून आयुष्यमान, ऑपरेशन ग्रीन यासारख्या योजनांसाठी पुरेश्या तरतुदी आहेत का? अशी शंका व्यक्त करुन त्यातील अप्रत्यक्ष मार्गही सांगितले. नोटाबंदी, जीएसटी, रेरा यासारख्या गोष्टींचाही या अर्थसंकल्पावर परिणाम जाणवतो. तसाच तो शेअर बाजारावरही जाणवला. अपेक्षा वाढवून ठेवल्यामुळेही पदरी काही वेळेस निराशा येते. ती या अर्थसंकल्पनामुळेही झाली, असे ते म्हणाले.
तरुणाई अर्थात  वयाच्या 35 वर्षाखालील युवकांची जीवन शैली, उत्पन्न शैली, गुंतवणूक शैली देेखील सरकारने या अर्थसंकल्पात प्रामुख्याने विचारात घेतली आहे. कारण या वयोगटाच्या सर्व्हिस इंडस्ट्रीतून जीडीपीमध्ये 54 टक्के वाटा येत आहे. त्यामुळे आता चाब्या नव्या पिढीकडे गेल्या आहेत. कृषी, उद्योग, सेवा ही वेगवेगळी क्षेत्र आहे. दिर्घकालीन गुंतवणूक करणार्‍यांना लॉग टर्म्स कॅपीटल गेन टॅक्स भरावा लागेल का? आणि त्यातून किती उत्पन्न मिळेल या विषयीही त्यांनी माहिती दिली. हा अर्थसंकल्प शब्दात नाही तर सुचक पद्धतीने अनेक गोष्टी सांगणारा आहे. अर्थसंकल्प म्हणजे आर्थिक राजकारण किंवा राजकीय अर्थकारण असेही म्हणून शकतात, असे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातील गणिते वेगळी असून त्या विषयी माहिती देतांना या क्षेत्राचे धोरण केंद्र सरकार ठरवते तर अंमलबजावणी राज्य सरकार करते. असे सांगून शेवटी राजकारण विरहीत भुमिका घेतली तर या अर्थसंकल्पावर कोणतीही टिका करता येणार नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यानंतर श्रोत्यांच्या प्रश्‍नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिलीत.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रास्ताविक श्रीधर इनामदार यांनी केले. अध्यक्षीय मनोगत भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन दुनाखे तर आभार विनित जोशी यांनी मानले. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.