लोकसभा, विधानसभेसाठी भाजपात बदलाचे वारे!

0

ऐनवेळेवर उमेदवार बदलणार : अनेकांनी लावली फिल्डिंग

(सुरेश पाटील)
यावल, दि. 20 –
गेल्या दिड-दोन वर्षातील रावेर विधानसभा मतदारसंघाचे राजकीय स्थितंतरे पाहता रावेर लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचे आगामी भाजपा उमेदवारी बाबतचे समीकरणे बदलणार असल्याचे राजकीय गोटात चर्चीले जात आहे. आगामी 2019 रावेर लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे तर येणार्‍या पुढील विधानसभेसाठी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनंतर आमदार हरिभाऊ जावळे यांनी दोन वेळा लोकसभेचे नेतृत्व केले मात्र 2014 च्या लोकसभेचे त्यांना तिकीट मिळूनही ऐन वेळेवर जावळे यांचे तिकीट कापले जावून खासदार रक्षाताई खडसे यांना भाजपाने तिकीट दिले. रावेर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या खासदार रक्षाताई खडसे करीत असून त्यांना उत्तम खासदार म्हणूनही लोकसभेने गौरविले देखील आहे.
दोन वर्षापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप झाल्याने श्री.खडसे यांनी गेल्या 40 वर्षात पक्षासाठी जे योगदान दिले ते सर्वशृत आहे. जेव्हा पक्षात मोजकेच कार्यकर्ते होते तेव्हा खडसे यांनी रात्रंदिवस एक करत पक्ष मोठा केला असला तरी आरोपातून खडसे यांना क्लीनचिट भेटूनही त्यांना मंत्रीमंडळात घेतले जात नाही; नुकत्याच झालेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीतही हे दिसून आले. पक्षाकडून खडसे यांच्यावर अन्याय होत आहे हे सर्वसामान्य नागरिकापासून लपून राहीले नाही. त्यामुळेच लेवा समाजासह संपुर्ण जिल्हा वासीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार निश्‍चित बदल होईल अशी शक्यता असल्याचे राजकीय गोटात वर्तविली जात आहे.
रावेर विधानसभेचे आगामी उमेदवार अनिल चौधरी यांच्या चर्चेमुळे उपस्थित होता तो असा की विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे असतांना भाजपाच्या वतीने अनिल चौधरी यांना उमेदवारी कशी मिळेल तर राजकीय विश्‍लेषकाच्या मते गेल्या वेळेस आमदार हरिभाऊ जावळे यांचे लोकसभेच तिकीट ऐन वेळेवर कापले गेल्याने भाजपा च्या एका गोटात खडसेंविषयी खदखद आहे. खडसेंचा हा नाराज गट मुख्यमंत्री तथा प्रदेश भाजपाच्या निकटचा आहे. या गटाने गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री तथा पक्षाचा विश्‍वास संपादन केला असून विविध कामगिरीव्दारे खडसेंची कमतरता कशी भरुन काढली जाते हे दाखवण्याचाच प्रयत्न केला आहे. पक्षाकडून खडसे यांना सध्या मिळत असलेली वागणूक पाहता रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांचे तिकीट कापून आगामी लोकसभेसाठी पक्षाकडून आमदार जावळे यांना पुन्हा गेलेली खासदारकी बहाल करण्यात येईल असा अंदाज विश्‍लेषकांना वाटतो.
रावेर लोकसभा मतदार संघात रावेर-यावल, भुसावळ, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापुरसह नांदुरा तालुक्याचा काही भाग आहे. रावेर-यावल, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापुर हे विधानसभा भाजपाकडे तर चोपडा सेनेकडे आहे. त्यामुळे आमदार जावळे सहज विजयी होतील असा विश्‍वासही खडसे विरोधी गटास आहे. त्यामुळे आगामी रावेर लोकसभेसाठी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नावाची तर आगामी विधासभेसाठी भाजपाचे उमेदवार भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

डॉ. फेगडेंना संधी मिळणार?
विधानसभा मतदार संघातील जातीच्या फॅक्टरीचा फार्मुला वापरला गेल्यास दोन्ही तालुक्यातील लेवा समाज बांधवाची संख्या पाहता लेवा समाजाचाही उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेस विधानसभा उमेदवारासाठी यावलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कुंदन फेगडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. डॉ. कुंदन फेगडे यांनी नगरसेवक म्हणून यावल पालिकेत अभ्यासपुर्वक मांडलेल्या काही विषयासह व सुचवलेल्या उपाय योजनांमुळे तालुक्यात त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.