लोकप्रतिनिधी हा आरोग्य प्रश्‍नांची जाण असणारा असावा

0

जळगाव दि.4-
जळगावातील लोकप्रतिनिधी हा उच्च विद्याविभुषीत असावा. त्याला शहरातील आरोग्य प्रश्‍नांची जाण असावी. स्वप्नातील जळगाव हे स्वप्नच ठरू नये असा सूर दै. लोकशाही आयोजित शहरातील नामवंत डॉक्टरांच्या चर्चेदरम्यान उमटला. यावेळी लोकव्यासपीठावर शहरातील जनरल सर्जन डॉ. दिपक पाटील, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. निलेश चांडक, पॅथॉलॉजिस्ट डॉ. प्रसन्न रेदासनी, शहरातील पहिल्या महिला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. किर्ती देशमुख, मनपा स्वीकृत सदस्य बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश पाटील, नाम ह्या संस्थेचे सदस्य ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. प्रताप जाधव यांनी या चर्चेत भाग घेतला. सुत्रसंचालन सहाय्यक संपादक राजेश यावलकर यांनी केले.
सानेगुरुजी रुग्णालयाच्या जागेवर सुसज्ज हॉस्पिटल बांधावे- डॉ. दिपक पाटील
शहरातील सर्वात जुने असलेले सानेगुरुजी रुग्णालय हे पाडण्यात आले आहे. तेथील जागा ही मोकळी असून तेथे दुकाने बांधून त्याच्यातून महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत मिळू शकेल तसेच या दुकानांच्या वर पुणे, मुंबईच्या धर्तीवर सुसज्ज हॉस्पिटल बांधता येवू शकेल. सानेगुरुजी रुग्णालयाची जागा ही खास रुग्णालयासाठीच आरक्षित आहे. सध्या शहरात महानगरपालिकेच्या रुग्णालयांची स्थिती गंभीर आहे. शहरातील जैन हॉस्पिटल, चेतनदास मेहता हॉस्पिटल चांगल्या वस्तीत आहेत. मात्र सुस्थितीत नाहीत त्यांना पाडून तेथे महापालिकेचे सुसज्ज हॉस्पिटल होवू शकते.बायोमेडीकल कचर्‍याच्या समस्या शहरात आहेत. त्याची विल्हेवाट योग्य रितीने व्हायला हवी. त्यामुळे शहरात रोगराई पसरते आहे. भावी प्रतिनिधींनी यात लक्ष घालावे.
तंबाखू व गुटका पुर्णपणे बंद व्हावा- डॉ. निलेश चांडक
राज्यात गुटखाबंदी असूनही शहरात गुटखा विकला जात आहे. तो पुर्णपणे बंद व्हावा. तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कॅन्सरसारखे आजार समाजात बळावत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याच भिंतींवर तंबाखू गुटखा खावून पिचकार्‍या मारलेल्या असतात. त्यावर दंडात्मक कारवाई व्हावी. या पदार्थांना बंदी हवी त्याने कॅन्सरला आळा बसेल. शहरात डायग्नोस्टीकची सुविधा नाही. सामान्य रुग्णालयात चांगले सिटी स्कॅन मशिन आहे. मशिनच्या सुरुवातीपासून मी लिहून दिलेले एकही सीटी स्कॅन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
रेडक्रॉस हा आरोग्य यंत्रणांचा मुख्य आत्मा- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी
रेडक्रॉस हा आरोग्य यंत्रणांचा मुख्य आत्मा असल्याने प्रतिनिधींनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन त्यात शंभर टक्के रक्तदान व्हायला हवे. त्याप्रमाणेच रक्तदानाचे होर्डिंग व बॅनर विनामुल्य हवे. थॅलेसिमिया सारख्या दुर्धर आजारात पेशंटची हेळसांड होते त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर डे केअर सेंटर उभारले जावे. रक्तदान , नेत्रदान याबरोबरच अवयव दानालाही शहरात प्रोत्साहन मिळावे. स्वेच्छा अवयव दान तसेच हृदय बदलविण्यासारखी सुविधा नाशिकात किंवा थेट जळगावातच उपलब्ध व्हावी.
70 वर्षानंतर मुलभूत सोयींसाठी संघर्ष- डॉ.प्रताप जाधव
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आपण मुलभूत जळगावात एके ठिकाणी गंदा नाला असे रेल्वेने बोर्ड लावला आहे. या नाल्यात औद्योगिक वसाहतीचे पाण्यासह 30किमीवर अंजनी-तापीच्या संगमात येवून मिळते. तेथे तीर्थस्नान केले जाते, याकडे लक्ष द्यावे. कार्पोरेट हॉस्पिटलसाठी प्रस्ताव दिला आहे तो धूळखात पडून आहे. यावेळी साध्या प्रदूषणापेक्षा लोकशाहीचे प्रदूषण घातक असल्याचा सूर उमटला. यासाठी सुजाण व्यक्ती निवडावयास हवी.
17 मजली नेते असूनही प्रश्‍न गंभीर-डॉ. राजेश पाटील
17 मजली इमारतीसारखे 17 मजली वजनी नेते असूनही मनपाचे प्रश्‍न गंभीर आहेत. आरोग्य ही 4थी गरज आहे. त्यावरच सर्वकमाई खर्च होते. याचे खापर डॉक्टरांवरच फुटत आहे.शहरातील नागरिकांचे मानसिक आरोग्यही सध्या बिघडत चालले आहे. त्यामुळे प्रश्‍नांची जाण असलेले प्रतिनिधी निवडून द्यावे
2030 साली मानसिक आजार नं.2 वर- डॉ. किर्ती देशमुख
मानसिक ताणतणाव वाढले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर 2030 साली हृदयरोगानंतर मानसिक आजार 2र्‍या स्थानी राहतील. यासाठी भावीप्रतिनिधींनी आतापासूनच त्यांच्या वार्डातील मानसिक ताणतणावाच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. समुपदेशन व्हायला हवे मनपा तसेच सिव्हीलमध्ये मानसोपचार विभाग सुरु व्हायला हवा. जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचाराच्या औषधी उपलब्ध नाहीत ही गंभीर बाब आहे. रुग्ण कल्याण निधी उभारला जावा याबाबतही सर्व मान्यवरांचे एकमत झाले.
शेवटी स्वप्न विरू नयेत. लोकसहभागातून जबाबदारीने सर्वांनी वागायला हवे. राजकारण उपजिविकेचे साधन होवू नये, असा समारोपाचा सार डॉ.प्रताप जाधव यांनी सांगितला.

Leave A Reply

Your email address will not be published.