रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ माेफत देणार

0

जळगाव | कोविड १९ प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी दिलेल्या मदतीमधून जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवकांच्या माध्यमातून कंटेन्मेंट झोनमधील कुंटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधांचा मोफत पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जात पडताळणी समिती अध्यक्ष तथा जिल्हा अापत्ती निवारण प्राधिकरणचे परिस्थिती नियंत्रक गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी दिलेल्या मदतीतून कंटेन्मेंट झोनमधील कुटुंबांना मोफत ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधांचा पुरवठा स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार आहे. या औषधाचे वाटप करणे, तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. २५ ते ४० वय असलेले स्वयंस्फूर्तीने काम करणारे स्वयंसेवक कंटेन्मेंट झोनमधून निवडण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे ५० कुटुंबासाठी एक स्वयंसेवक नेमण्यात यावा. कुटुंबांची यादी तयार करून सलग असलेली कुटुंब घेण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयातून बुधवारी तहसीलदारांना ५०-५० डब्यांचे बंडल तयार करून देण्यात आले. तहसीलदारांकडून कंटेन्मेंट झोनमधील कुटुंबांची संख्या विचारात घेऊन कंटेन्मेंट झोन आॅफिसरकडे या औषधी देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक स्वयंसेवकास ५० बॉटल्स देण्यात येतील. स्वयंसेवक त्यांच्याकडे असलेल्या ५० कुटुंबीयांना वाटप करतील. स्वयंसेवकांनी औषधांचे वाटप सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवायचे असून मास्क घातल्याशिवाय कोणीही औषध वाटप करायचे नाही. औषधांचे सेवन कसे करायचे याचे व्हिडिओ हे कटेंन्मेंट झोन ऑफिसर यांच्यामार्फत स्वयंसेवकांना पाठवावे, असे अादेश देण्यात अाले अाहे.
फिजिकल डिस्टन्सिंग पाळून अाैषधी वाटप करावे
औषधांचे वाटप सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ कुटुंबांना पाठवले आहेत, याची खात्री कंटेंन्मेंट झोन ऑफिसरने करावयाची आहे. औषधांचे वाटप सुरळीतपणे कोणतीही गडबड न होता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होईल, याची दक्षता कंटेन्मेंट झोन आॅफिसर व स्वयंसेवकांनी घ्यावयाची आहे, असे आदेश गाडीलकर यांनी दिले आहेत.
वाघनगरात पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने बंद केलेला रस्ता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.