राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

0

नवी दिल्ली | लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर प्रथमच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे.  लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी न राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी सादर केलेला राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने फेटाळला असला तरी राहुल राजीनाम्यावर ठाम आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह केल्यानंतरही राहुल मानायला तयार नाहीत. त्यात नेत्यांची भेट टाळणाऱ्या राहुल यांनी आज अचानक पवारांचे निवासस्थान गाठल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
राहुल-पवार भेटीत राष्ट्रवादी पक्ष विसर्जीत करून काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत खल झाल्याचे कळते. त्यातच दोन्ही पक्षांचं हित असल्याचंही अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसकडे लोकसभेत ५२ खासदारांचं बळ असणार आहे. हे संख्याबळ विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं नाही. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळेल. पर्यायाने राहुल गांधींचा विरोधी पक्षनेते होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसे झाल्यास राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावं, असे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील निवडणुकीवर चर्चा झाली. पक्ष विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे शरद पवार यांनी बैठकीनंतर सांगितले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची आपणास ऑफर आहे का, असे विचारले असता काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी, असे सूचक वक्तव्य पवारांनी केले. राहुल यांच्या राजीनाम्यावर बोलताना, पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही, असे नमूद करत राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे, असा सल्ला पवार यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.