राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी विराटची शिफारस

0

नवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असलेल्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक परिषदेनं (बीसीसीआय) आज त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतं.

तर, भारत ‘अ’ व १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून मोलाची कामगिरी करणाऱ्या माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचं नाव द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सुचविण्यात आलं आहे.

‘खेलरत्न’साठी विराटच्या नावाची शिफारस केली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१६ सालीही त्याचं नाव पुढं करण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी त्याला हा पुरस्कार मिळू शकला नव्हता. यंदा या पुरस्कारासाठी त्याची निवड झाल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर ‘खेलरत्न’ मिळवणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल. तेंडुलकरला १९९७ साली तर, महेंद्रसिंग धोनी याला २००७ साली ‘खेलरत्न’नं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी बीसीसीआयनं अन्य काही नावांचीही शिफारस केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.