मोठी बातमी: शक्ती मिल गँगरेप प्रकरणी आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल बदलला आहे. मुंबई सत्र न्यायालायने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा बदलून ती जन्मठेपेत बदलली.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणाने मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी सर्वच स्तरातून उमटली होती. 2013 मध्ये घडलेल्या या घटनेतील क्रूरकर्मे विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अंसारी यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, या शिक्षेला या आरोपींनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं.

मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. आज सुनावनीसाठी आरोपींना VC द्वारे हजर केले गेले. तर राज्यसरकारचे वकिल दिपक साळवी हे देखील या सुनावनीला ऑनलाईन उपस्थित होते.

मुंबईतल्या महालक्ष्मी येथे असलेल्या शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी एका महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ही महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटोग्राफी करण्यासाठी या मिल कपांऊंडमध्ये आले होती. त्याचवेळी पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. आता कोर्टाने याप्रकरणातील इतर आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी या तिघांच्याही फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेमध्ये केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.