‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’चा पंतप्रधान मोदींचा नारा

0

नवी दिल्ली । भारताचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सातव्यांदा देशाला संबोधन केलं. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो, असं मोदी यावेळी म्हणाले.

एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. भारतासाठी स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य असून आपण निश्चितच हे स्वप्न पूर्ण करु. मला आपल्या देशातील गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या नागरिकांवर, युवकांवर आणि महिलांवर विश्वास आहे. भारताच्या दृष्टीकोनावर माझा विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. याशिवाय वेदांमध्ये वसुधैव कुटुंबम सांगितलंय, तसंच विनोबा भावे म्हणत होते जय जगत. भारतानं विश्व हेच आपलं घर ही संकल्पना कायम जोपासलीय, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.