मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य

0

जळगाव ;- मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की आपल्याला वाटते आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. हे जरी खरे असले, तरीही मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. वेगवेगळ्या कारणांनी (व्यक्ती व परिस्थितीजन्य) त्यात नियमित बदल होत राहतात. त्याचे स्वरूप व दर्जा यांत फेरफार होत राहतात. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय? त्यात कोणकोणत्या बाबींचा, प्रक्रियांचा समावेश असतो? मानसिक सुदृढता व स्वास्थ्य का महत्त्वाचे असते? या प्रश्नांची उत्तरे जीवनविषयक योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी प्रेरक ठरतील.जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येप्रमाणे ‘आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर त्याजोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची पूर्णस्वरूप स्थिती असणे होय.’ या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशावरून त्याचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. WHO ने केलेली मानसिक आरोग्याची व्याख्याही या बाबीवर प्रकाश टाकते. या व्याख्येप्रमाणे ‘मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती- ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरीत्या कार्यरत राहील व समाजाप्रति योगदान देऊ शकेल.’ या समर्पक व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व आणि त्याचा सखोल व दूरगामी प्रभाव दिसून येतो.

मानसिक आरोग्य : मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य.
ह्या पदाच्या दोन संकल्पना प्रचलित आहेत: पहिली संकल्पना ‘मानसिक विकारांचा अभाव’ अशी असून ती अभावार्थी व अपूर्ण आहे.
आधुनिक संकल्पना भावार्थी असून ती अशी आहे : ‘ज्या दीर्घकालीन मानसिक अवस्थेत व्यक्तीला एकंदर बरे वाटते (भाव सर्वसाधारणपणे सुखकारक असतात तसेच गैरभावनांचा अतिरेक नसतो), तिची विचारसरणी बुद्धिप्रणीत व वागणूक समाजमान्य असून जीवनातील विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी ती झटत असते, तरीपण ते न साधल्यास असंतुष्ट होत नसते, तिला मानसिक आरोग्य असे संबोधतात.’ ह्या संकल्पनेतील फक्त महत्त्वाचे गुणक वर दिले आहेत.
याशिवाय इतर गुणक आहेत ते असे :
(१) इतरांशी, विशेषतः निकटवर्तियांशी आधारदायी व स्थिर नाते जुळवण्यांची क्षमता.
(२) आत्मप्रतिमा उंचावलेली नसली, तरी डागळलेलीही असता कामा नये. स्वतःच्या उणिवा प्रथम मान्य करून मग त्या सुधारण्याची तसेच स्वतःच्या क्षमता वाढवून त्या पूर्णत्वाला न्यायची तयारी.
(३) आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी.
(४) समस्या, दडपणे व संकटे ह्यांना तोंड देण्याची तयारी.
(५) इतरांच्या व्यक्तिमत्त्वाला तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य तो आदर दाखवण्याची व महत्त्व द्यायची तयारी.
(६) जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली जीवनमूल्ये.अर्थात सर्वसाधारण व्यक्तीचे मानसिक आरोग्य आदर्श नसल्याकारणाने वरील गुण कमीअधिक प्रमाणात असणे मानसिक आरोग्याच्या संकल्पनेत अंतर्भूत आहे. तसेच वरील गुणांचे प्रमाण व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक क्षमतेवर तसेच सामाजिक व सांस्कृतिक स्तरावरही अवलंबून असते.

मानसिक आरोग्याची दशा ठरविणारे कारक पुढीलप्रमाणे आहेत :
(१) जननिक घटक : काही मानसिक विकार (उदा., उद्दीपन-अवसाद-चित्तविकृती व छिन्नमानस) आनुवंशिक असल्यामुळे, मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी अशा आनुवंशिक रोगांच्या जननिक कारकांचा पूर्ण अभाव असणे जरूरीचे आहे.

(२) व्यक्तिमत्त्वविकासकारी घटक : मुलांचा निरोगी व्यक्तिमत्त्वविकास त्यांच्या आईवडिलांशी असलेल्या घनिष्ठ नात्यावर तसेच घरातल्या आधारदायी वातावरणावर अवलंबून असतो.

(३) सामाजिक घटक :व्यक्तीचे जीवन तिच्या सामाजिक व आर्थिक स्थितीवर तसेच सामाजिक घटनांवर व प्रचलित संस्कृतीवर अवलंबून असते. सामाजिक संघर्ष, समस्या व ताणांचा अनिष्ट परिणाम होऊन मानसिक अस्वास्थ्य उद्‌भवते. याउलट सामाजिक उन्नती तसेच परिस्थिती व संबंधापासून, विशेषतः सुख व समुद्धी देणाऱ्या वैवाहिक व कौटुंबिक जीवनापासून, आधार मिळाल्याने मानसिक आरोग्य अबाधित राहते.

(४) शारीरिक घटक : निरोगी शरीरप्रकतीमुळे वाटणारा व्यक्तीचा आत्मविश्वास मानसिक आरोग्यास पोषक ठरतो. सर्वसाधारण व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात काही उणिवा असतात पण त्या मर्यादित असतात. विशेष प्रमाणातील उणिवांतून मात्र पुढे मानसिक विकार उद्‌भवू शकतात.

मानसिक आरोग्य कायदा किती फायद्याचा?

७ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत बहुमताने मानसिक आरोग्य सेवा कायदा (The Mental Health Care Act (MHCA)) संमत करण्यात आला आणि २९ मे २०१८ पासून या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली. हा कायदा म्हणजे, मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबतच्या गैरसमजूतींतून मुक्तता देण्यासाठी उचलले गेलेले एक महत्वाचे पाउल असल्याचे सांगतिले जात आहे. तसेच आरोग्य सेवा कायदा १९८७, या जुन्या मानसिक आरोग्य कायद्यातील काही कलमे ही मानसिक आरोग्याच्या सेवेला रुग्णकेंद्रित दृष्टीकोनातून पाहण्यात अपयशी ठरली होता, अशा काही कलमांमध्येही सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. देशभरातील मानसिक आरोग्यासाठीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काही धोरणे आणि कायदेशीर चौकट असावी, ही मागणी बराच काळापासून प्रलंबित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतातील ७.५% लोकसंख्या ही कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येची शिकार आहे. जगभरातील मानसिक आणि मज्जातंतू संबधित आजारातील भारताचा वाटा १५% आहे. या अहवालाने मानसिक आरोग्य सेवांच्या तरतुदीतील एकूण विषमता देखील उघड केली आहे.भारतातील एक दशलक्ष लोकसंख्येमागे निव्वळ तीन मानसोपचारतज्ज्ञ असून मानसशास्त्रज्ञांची संख्या तर त्याहून कमी आहे, असेही या अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. अर्थात प्रती एक लाख व्यक्तीमागे ५.६ मनसोपचारतज्ञ असले पाहिजेत या, राष्ट्रकुलच्या निकषांनुसार हे प्रमाण १८ पटीने कमी आहे. भारतातील मानसिक आरोग्याची भीषण स्थिती पाहता, संमत करण्यात आलेल्या या कायद्याची गरज आणि महत्व पुन्हापुन्हा अधोरेखित होते.या पार्श्वभूमीवर, एमएचसीएद्वारे (MHCA) मानसिक आरोग्याच्या परिसंस्थेशी संबधीत काही मुलभूत समस्यांची दखल घेतली जात आहे, असे दिसते. यामध्ये रुग्णाला वेगवेगळ्या उपचार पद्धतींमधून निवड करण्याची सुविधा, आत्महत्येच्या प्रयत्नाला बेकायदेशीर कृत्यातून वगळणे आणि विद्युतप्रवाहद्वारे शॉक देण्याच्या उपचार पद्धतीवर निर्बंध अशा काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तरीही मानसिक आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण आणि वर्णन करणाऱ्या ज्या काही संज्ञा आहेत त्या अधिक बारकाईने पाहिल्यास या कायद्याने अजूनही काही प्रश्न अनुत्तरीतच ठेवले आहेत असे वाटते.

प्रा. डॉ उमेश वाणी
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव

Leave A Reply

Your email address will not be published.