”माझ्या इतक्या चौकश्या झाल्या तो राजकीय विषय नव्हता” ; एकनाथ खडसे

0

जळगाव प्रतिनिधी : बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं. या प्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल, असा सवाल खडसे यांनी यावेळी उपस्थित केला.

जळगाव बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो. माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो, अशा तिरकस शब्दांत खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.