महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग,असा तुमचा प्रकार ; शिवसेनेची भाजपवर टीका

0

मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रण पेटले असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यात भाजपनं वीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दाही काढला आहे. दरम्यान, नागरिकत्व कायदा आणि सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य केलं आहे.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे ढोंग साफ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकत्व कायद्यावरून देश का पेटला, याचं उत्तर आधी जनतेला द्या, असं आव्हान शिवसेनेनं भाजपला दिलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला. हे प्रकरण केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये आग लागली आहेच, पण बिहार, लखनऊसह इतर राज्यांतही पेटवापेटवी सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत तर सगळ्यात जास्त तणावाचे वातावरण दिसत आहे. विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ‘जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या. गोळ्या चालवल्या. आपल्याच देशातील विद्यार्थ्यांवर बंदुका रोखण्याची वेळ येते तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले असे समजावे. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते. १९८४ च्या शीख हत्याकांडावर बोलण्याचा अधिकार आता भाजपास उरला आहे काय? असा सवाल शिवसेनेनं केला. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात जो हिंसेचा भडका उडाला, त्याबाबत पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे शांततेचे आवाहन केले आहे. या भडक्यामागे पाकिस्तानचे डोके आणि हात असल्याचे जाहीर केले. असे सांगणे ही मोदी सरकारची हतबलता आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली.

देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून रण पेटले असतानाच भाजपने वीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दाही काढला. वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. प्रश्न इतकाच आहे की, गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. ‘भारतरत्न’ देऊन वीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते? दुसरे असे की, सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारी ‘आयात’ मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात?, असा खडा सवालही त्यांनी केला.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.