महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यक सुरक्षितता बाळगावी अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहर तसेच परिसरात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान वांजोळा रोड व अयोध्या नगरजवळ उड्डाणपुलाचे व बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. दळणवळणासाठी मातीचा कच्चा रस्ता बनवण्यात आला आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. रात्री अंधारात डोळ्यात धूळ गेल्याने एका पाठोपाठ चालणारी वाहने दिसेनाशी होऊन अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर हा मार्ग खडतर झाला आहे. धुरळा उडू नये म्हणून रस्त्यावर रोज पाण्याचा वापर करूनच दबाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी महामार्ग विभाग प्रकल्पप्रमुख चंद्रमोहन सिन्हा यांच्याकडे केली आहे.

जड वाहनांमुळे दिवसभर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरात धूळ घुसत आहे. त्यामुळे घरातील उपकरणे, सोफा, दिवाण आदी साहित्य खराब होत आहे. धुळीचे कण नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व घसा दुखण्याच्या त्रास सुरू झाला आहे. धुळीमुळे दमा, अस्थमाच्या रुग्णास जास्त त्रास होतो. मुलांची श्वसनक्षमता कमी होते. वारंवार धुळीत राहिल्याने फुप्फुसाची हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. तसेच लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कोरोना काळात हे धोकादायक ठरू शकते.

शिवसेनेतर्फे आंदोलन करणार:

महामार्गाच्या जवळ असलेले दुकान व घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिक व व्यापारीही हैराण झाले आहेत. अश्या तक्रारी नागरिकांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्याकडे केल्या आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यकती सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. धुळीमुळे अपघातात नागरिक दगवल्यास महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. वेळीच महामार्ग प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा बबलू बऱ्हाटे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.