मकर संक्रांतीनिमित्त बाजारात विक्रीसाठी तिळगुळ दाखल

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पारोळा बाजारपेठेत तिळगुळ विक्रीस दाखल झालेले आहे. मागील दोन वर्षापासून मकर संक्रांतीच्या सणावर कोरोनामुळे संक्रात आल्याचे दिसत आहे. यावर्षी ही मकर संक्रातीच्या जवळपासच कोरोनाने डोके वर काढले आहे.

मकर संक्रांतीचा सण कुठे पतंग उडवून तर कुठे तिळगुळ वाटप करून साजरा करण्यात येत असतो. खान्देशात या सणाच्या दिवशी एकमेकांना तीळ-गूळ वाटून आपसातील कटूपणा दूर करावा व सदैव आपण एकमेकांशी गोड राहावे अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात. म्हणून या सणाला खान्देशात मोठे महत्त्व आहे. या दिवशी लहान-मोठे एकमेकांना तीळ-गूळ वाटून तसेच ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असे सांगून एकमेकांप्रती आदर व्यक्त करीत असतात व एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात, परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे निर्बंध असल्याने हा सण फारच कमी प्रमाणात साजरा करण्यात येत असल्याचे जाणवत आहे.

विक्रेत्यांनी व्यक्त केली खंत

एका विक्रेत्याने दैनिक लोकशाहीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, मी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून तिळगुळ विक्रीचा व्यवसाय करीत आहे. परंतु मागील तीन वर्षापासून तिळगुळाच्या या व्यवसायात मला नफा कमी आणि नुकसान जास्त झाले आहे. अशी खंत या विक्रेत्याने व्यक्त केली. आधी अनेक लोक तिळगुळ घेण्यासाठी येत असत परंतु कोरोनामुळे अनेकांनी या सणाकडे पाठ फिरवली आहे. म्हणून आमच्या व्यवसायावरही याचा परिणाम झालेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.