भोनक नदीवरील बंधाऱ्याचे निधीअभावी काम रखडले!

0

साकळी ता.यावल (वार्ताहर)- येथील परिसरातून वाहणाऱ्या भोनक नदी पात्रात  हातनुरच्या पुलाजवळील साठवण बंधाऱ्याचे काम गेल्या तब्बल दोन वर्षापासून निधीअभावी रखडले असून  बंधाऱ्याच्या भिंतीत नुसत्या निडल (फळ्या) टाकल्या गेल्या नसल्याने हातनूर मधील सांडव्याचे पाणी नुसते वाया जात आहे. त्यामुळे कधीकाळी साकळीकरांना एका पाण्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे स्वप्न पडले होते मात्र ते स्वप्न आता कायमचे भंगले की काय ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या बंधाऱ्यामुळे गावाची पाणी टंचाई दूर होण्यास खूप मोठी मदत होणार होती मात्र बंधाऱ्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

याबाबत सविस्तर असे कि,शासनच्या मृद व जलसंधारण विभाग (जळगाव) मार्फत साकळीसह परिसरातून वाहणार्‍या भोनक पात्रात हातनूरच्या पुलाजवळ पाणीसाठवण बंधाऱ्याचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून करण्यात आलेले असून बंधाऱ्याच्या भिंतीत नदीच्या पुराचे पाणी व माती- गाळ वाहून जाण्यासाठी सहा ठिकाणी मोकळे भाग(गाले) ठेवण्यात आलेले आहे. या मोकळ्या भागांच्या ठिकाणी पावसाळा गेल्यानंतर निडल (फळ्या) बसवण्याचे नियोजन होते मात्र संबंधितांनी मिळालेल्या माहितीनुसार या कामासाठी सध्या निधीच उपलब्ध नसल्याने गेल्या दोन वर्षापासुन या बंधाऱ्यास निडल (फळ्या) बसवण्यात आलेल्या नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणी साठवण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. पावसाळा संपल्यानंतर हातनुर च्या कालव्यातून येणाऱ्या सांडव्यामार्फत सदर बंधाऱ्यात पाणी साठवण करण्याच्या नियोजनातून हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. या अपूर्ण अवस्थेतील बंधाऱ्याकडे जेव्हा ग्रामस्थांची लक्ष जाते तेव्हा त्यांच्या मनात विविध प्रकारच्या शंका निर्माण होत असतात व अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कामाच्या बाबत बोट ठेवले जाते. तेव्हा संबंधित विभागाने अपूर्ण बंधाऱ्याच्या कामाकडे तात्काळ लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा व  कामावर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी साकळी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गेल्या जवळपास अकरा ते बारा वर्षापूर्वी या बंधाऱ्याचे काम सुरू होऊन काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले होते. मात्र सध्या पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या बंधाऱ्याचे काम मागील वर्षी सुरू झाले होते. त्यानंतर आता या बंधाऱ्याच्या कामावर फक्त निधी उपलब्ध होऊ न शकल्याने काही काम अपूर्ण राहिले. त्यामुळे ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिली ‘ या म्हणीप्रमाणे या कामाची अवस्था झालेली आहे. त्यामुळे साकळी करांना कधीकाळी पाण्याने तुडुंब भरलेल्या साठवण बंधाऱ्याचे स्वप्न पडले होते व ती स्वप्न आता प्रत्यक्षात पुन्हा एकदा भंगते की काय ? असा संभ्रम निर्माण झालेले आहे. अशा प्रलंबित कामांमुळे शासन व प्रशासन या दोघांचाही साकळी गावाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते.असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तरी सदरील साठवण बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर निधी उपलब्ध करून पूर्ण केले जावे. अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.