पाचोऱ्यात भाजपातर्फे न.पा. व आमदारांविरोधात अनोख्या पद्धतीने पोस्टरबाजी करून आभार प्रदर्शन

0

पाचोरा (प्रतिनिधी) :   येथील आमदारांच्या नेतृत्वाखालील पाचोरा नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या जनतेच्या व्यथा प्रदर्शित करणारी अनोखी पोस्टरबाजी करून येथील भारतीय जनता पार्टी तर्फे “होय करून दाखवलं” या शिर्षकाखाली सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्यात आले आहेत. या पोस्टरबाजी मुळे सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने रणशिंग फुंकल्याने पाचोर्‍यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

शहरातील नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामामुळे पर्यायी व्यवस्था व कुठलेही नियोजन न केल्याने नागरिकांना कोरोना सारख्या परिस्थितीत तासंतास वाहतूक वर्दळी मध्ये अडकून राहावे लागत असतांनाच दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. आणि पुन्हा एकदा नगरपालिकेच्या भोंगळ कारभार यावेळी निदर्शनास आला आहे. त्यात प्रामुख्याने भुयारीमार्गातून जाणारा अत्यंत रहदारीच्या बोगद्यातून पूर्णपणे पाणी साचून ह्या बोगद्याला एकप्रकारे नदीचे स्वरूप पाहायला मिळाले अशा परिस्थितीत देखील अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतण्यासाठी जीवाची पर्वा न करता कमरेपेक्षा जास्त पाण्यात उतरून यातून मार्ग काढावा लागला.

यावेळी भारतीय जनता पार्टी कडून संपूर्ण परिस्थितीला न. पा. व तालुक्याचे अकार्यक्षम आमदार जबाबदार असून त्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा आरोप करून आता बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी गोवा किंवा कोकणात जाण्याची गरज नाही शहरवासीयांसाठी बोट क्लब ची निर्मिती करून दाखवल्या बद्दल जाहीर आभार मानणारे उपरोधात्मक टीकेचे पोस्टर शहरातील विविध कॉलनी परिसरात लावल्याचे दिसून आले. त्यासोबतच भारतीय जनता पार्टी पाचोरा तर्फे आमदारांनी जनतेच्या पैशाने शहरात निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आरोप करत, शहरातील विविध भागांमधील घाणेने तुंबून भरलेल्या गटारी, जागोजागी कचऱ्याचे साचलेले ढीग, भुयारीमार्गात साचलेले पाणी तसेच निकृष्ट दर्जाचे तयार केलेले  रस्ते व त्यावर तयार झालेले खड्डे, चिखल आणि त्यात तुडुंब भरलेले पाणी इत्यादी निकृष्ट दर्जाच्या कामचे फोटो काढून त्यांना लोणार सरोवर, जळगाव येथील मेहरून तलाव, आनंद सागर येथील कारंजा, वॉटर पार्क, तसेच मोफत रुग्णालयात घेऊन जाणारा रस्ता या पद्धतीने उपमा देऊन उपरोधात्मक टिका करणारे पोस्टर  लावून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे.

शहरात या पोस्टरबाबत नागरिकांमध्ये एकच चर्चेचा विषय ठरला असून नागरिक देखील त्याला दाद देत आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टी तर्फे अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊन देखील विषयाचे गांभीर्य लक्षात येत नसून अशा निकृष्ट कामांना पर्यटन व मनोरंजन स्थळांची उपमा देणारे पोस्टर लावुन तरी गांभीर्य लक्षात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी नागरिकांना अशा पर्यटन व मनोरंजन स्थळांचे दर्शन पाचोऱ्यात घडवून आणल्याबद्दल त्रस्त नागरिक व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी नगरपालिकेतील सत्ताधारी  शिवसेनेचे नगराध्यक्ष संजय गोहिल यांचा भा.ज.पा. तालुकाअध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात सत्कार करून आभार मानण्यासाठी नगरपालिकेत गेले असता नगराध्यक्षांचे दालन बंद असल्याने त्यांच्या दालनाच्या प्रवेशद्वारालाच पुष्पहार व श्रीफळ घालून आभार पत्र चिटकवून यावेळी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी भा.ज.पा. शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, सरचिटणीस, दिपक माने, गोविंद शेलार, संजय पाटील, भा.ज.यु.मो. शहराध्यक्ष समाधान पाटील, सरचिटणीस भैया ठाकूर, कुमार खेळकर, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती, रमेश शामनानी तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.