भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

0

छत्तीसगड –

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असेलेला सस्पेन्स आज अखेर संपुष्टात आला आहे. छत्तीसगडचे आगामी मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ काँग्रेसनेते भूपेश बघेल यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केलं असून लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये भूपेश बघेल यांच्यासह टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास महंत या तिघांचा समावेश होता. मात्र या तिघांनाही मागे टाकण्यात बघेल यशस्वी ठरले आहेत. बघेल हे छत्तीसगड काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रमुख असून शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. आक्रमक नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपासून ते नगर पालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणनीती बघेल यांनीच तयार केली होती. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच काँग्रेसला छत्तीसगडमध्ये ९० जागांपैकी ६८ जागा जिंकता आल्यानेच काँग्रेस हायकमांडने बघेल यांच्याकडे मुख्यमंत्रपदाची सूत्रे सोपविल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

बघेल यांचा राजकीय प्रवास 

मध्यप्रदेशातील (आताच्या छत्तीसगड) दुर्ग येथे २३ ऑगस्ट १९६१ रोजी जन्मलेल्या बघेल यांनी ८०च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणास प्रारंभ केला. दुर्ग जिल्ह्यातच ते युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९० ते ९४ पर्यंत जिल्हा युवक कमिटी, दुर्ग (ग्रामीण )चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९९३ ते २००१ पर्यंत मध्यप्रदेश हौसिंग बोर्डाचे ते संचालक होते. २०००मध्ये छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी पाटन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेत प्रवेश केला. या काळात ते कॅबिनेट मंत्रीही झाले. २००३ मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर ते विरोधी पक्षाचे उपनेते झाले. २०१४ मध्ये त्यांची छत्तीसगड काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.