भुसावळ पालिकेचा भोंगळ कारभार ; शहरातील पथदिवे दिवसा सुरू संबंधित मात्र अनभिज्ञ

0

भुसावळ (प्रतिनिधी)-जळगाव रोड विभागात श्रीनगर, खळवाडी, काशीराम नगर परिसरात तर जामनेर रोडवरील अंतर्गत भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसाही पथदिवे सुरू राहत आहेत. त्यामुळे हा विषय नागरिकांमध्ये चर्चेचा ठरला आहे. अनेक भागांत रात्री दिवे बंद असतात. त्यामुळे त्या भागात अंधार असतो. तर दुसरीकडे, गरज नसताना दिवसा दिवे सुरू राहत असल्याने भुसावळ नगरपालिकेला विजेचे जादा बिल भरावे लागत आहे.

प्रत्यक्षात रात्रीसह दिवसाही पथदिवे चालूच ठेवण्याचा विक्रम भुसावळात दिसत आहे. त्यामध्ये नागरिकांचेच नुकसान होते. कुठेही सुधार आणि मेन्टेनेन्सचे काम सुरू नसतानाही हे पथदिवे सुरू राहत असल्याने वीज बचती बाबत भुसावळ पालिकेची उदासिनता लक्षात येते. अशीच परिस्थती शहरातील अनेक भागांत आहे. तसेच यात दुर्लक्ष झाल्यामुळे विजेचा अपव्यय होत असून, याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कुठे अंधार तर कुठे दिवसा दिवाळी:
शहरातील रस्त्यांवरील अनेक ठिकाणचे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान शहरातील पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कोटयावधी रुपयांचे काम दिलेल्या कंपनीचाच ठाव ठिकाणा नाही. तर काही ठिकाणी वेगळेच चित्र समोर येत आहे.या दिवाळीबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे

शिवसेना आंदोलन करणार:
प्रामाणिकपणे महिन्याकाठी विजेचे बिल भरणाऱ्या नागरिकांना मात्र दिवसा जळणारे पथदिवे बघून पालिकेच्या विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराची चीड येत आहे. दरम्यान पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करार केलेल्या कंपनीकडून सुरळीत सेवा मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर याबाबत तात्काळ तोडगा काढून शहरातील दिवाबत्ती सेवा सुरळीत करण्यात यावी अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल असा इशारा तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व शिवसैनिकांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.