भुसावळात चार मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

0

भुसावळ (प्रतिनिधी)- घातक मांजाच्या विक्रीस बंदी घालण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून त्या आधारावर न्यायालयाने मांजा विक्रीस बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यात धडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर भुसावळसह मुक्ताईनगरात मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याने मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरात चार तर मुक्ताईनगरात एका विक्रेत्यावर कारवाई करण्यात येवून गुन्हे दाखल करण्यात आले.

भुसावळात पोलिसांची धडक कारवाई

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ, शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेत नॉयलॉन मांजाची विक्री करणार्‍यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचार्‍यांनी शहरात विविध ठीकाणी छापे टाकले तर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत चार मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.

चार विक्रेत्यांवर कारवाई

शहरातील जामनेर रोडवरील घनश्याम कोल्ड्रींक्स या दुकानाचे मालक घनश्याम प्रजापत यांच्याकडून एक हजार 500 रुपये कींमतीचा मांजाने भरलेल्या चक्री जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सोमवारी दुपारी 1.30 वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हवालदार रमण सुरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई शहरातील जाम मोहल्ला भागात करण्यात आली. जाम मोहल्ला भागातील भजे गल्ली परीसरात रतेश शामप्रसाद चौरसिया यांच्याकडून मांजाने भरलेल्या एक हजार 200 रुपये किंमतीच्या चार चक्री जप्त करण्यात आल्या. शहरातील सिंधी कॉलनी भागातील जयराम गोवर्धनदास थावरानी यांच्याकडून 880 रुपये किंमतीच्या मांजाने भरलेल्या 11 चक्री जप्त करण्यात आल्या. हवालदार उमाकांत पाटील व सहकार्‍यांनी सोमवारी दुपारी 2.30 वाजता करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुतार गल्लीत भूषण पितांबर अहिरे हे नॉयलॉन मांजा विक्रीत करताना आढळल्याने 300 रुपये किंमतीच्या मांज्याच्या सहा चक्री जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी संजय बडगुजर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहा.फौजदार संजय कंखरे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.