भुसावळच्या रेल्वे विभागीय कार्यालयात सीबीआयचा छापा; दोन अधिकार्‍यांना अटक

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ येथील रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात दोन अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफीस असून यातून भुसावळ रेल्वे मंडळाचा प्रशासकीय कारभार चालत असतो. याच डीआरएम ऑफिसमध्ये आज दुपारच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने धाड टाकल्याची  माहिती मिळाली आहे. यातील कारवाईचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी यात दोन अधिकार्‍यांना लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी दोन लाख ४० हजारांची लाच मागणार्‍या भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- १) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना कार्यालयातच लाच स्वीकारताना नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केल्याने खळबळ उडाली. नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी ४० हजारांची लाच स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे.  दरम्यान, दोघा अधिकार्‍यांच्या घराची सीबीआयकडून तपासणी  सुरू असून  चौकशीस प्रारंभ केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.