भडगाव येथील रिद्धी सिद्धी श्री गणेशाचे दुर्मिळ पौराणीक मंदीर

0

पेशवेकालीन हेमाडपंथी मंदिर

भडगाव (सागर महाजन) : शहरात गिरणा नदीच्या काठावर शनिचौक भागात दुर्मीळ व श्री गणेशाचे पुरातन मंदीर वसले आहे. या मंदीरावर वर्षभर साज सजावट होउन विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत केले जातात. हे गणेशाचे मंदिर प्रसिद्ध असुन वर्षभर मंदीरावर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. नवसाला पावणारा गणपती मानला जातो. हे मंदीर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. माञ सध्या लाॅकडाउनमुळे मंदीरावर शांतता असल्याचे दिसुन आले.

याबाबत माहीती अशी कि,जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहर हे अतिशय प्राचीन व ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. गिरणा नदीचा सुपीक परिसर लाभला आहे. त्यामुळे केळी, कापूस, ऊस या पिकांसाठी जसे प्रसिद्ध आहे, तसे या परिसरास सांस्कृतिक व धार्मिक वारसादेखील आहे. अर्वाचिन कवितेचे जनक आद्यकवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या वास्तव्याने सांस्कृतिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे. भृग ऋषींच्या वास्तव्याने पावन भृग ग्राम ते मोठ्या संख्येने भटजींच्या वास्तव्यामुळे भडगाव, अशी भडगाव नावाची कहाणी आहे.

ब्राह्मणाच्या वस्तीमुळे येथील मंदिरांना अध्यात्मिक व ऐतिहासिक महत्वदेखील आहे. यात पेशवेकालीन सिद्धिविनायक मंदिर हे अतिशय प्रसिद्ध आहे. भडगाव येथील गिरणा नदीच्या काठावर हे आकर्षक व ऐतिहासिक गणेश मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती मानला जातो.नागपूरचे जानोजीराव भोसले यांनी बंड केले म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी १७६५ साली पेशवे नागपूरवर चालून गेले. त्याकाळी युद्धाच्या निमित्ताने पेशव्यांच्या सैन्याचा भडगावी गिरणा नदीच्या पात्रात पाडाव होता. पेशवे हे गणेशभक्त असल्यामुळे त्यांचा दिनक्रम हा गणेशपूजनाने सुरुवात होत असे. त्यामुळे पेशव्यांनी हे मंदिर बांधून घेतले. गिरणेच्या विस्तीर्ण पात्रात सैनिकांचा मुक्काम असे. पाण्यामुळे सैनिकांचा आंघोळीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटत असे. देवळाचे बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचे आहे. पुरातन काळातील काळ्या दगडातील मंदिराचे बांधकाम आहे. मंदिरासमोर २० बाय २० फूट आकाराचा सभामंडप आहे. मंदिरात रिद्धी -सिद्धी या देवतांसह आकर्षक संगमरवरातील गणेशमूर्ती अतिशय विलोभनीय व आकर्षक आहे. मूर्तीच्या डोक्यावर पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे राज्यांच्या सिहासनावर जसे शाही छत्र असायचे तसे लाकडाच्या महिरपवर चांदीचा मुलामा व त्यावर कलाकुसर केलेले शाही छत्र आहे. अशा प्रकारची मूर्ती महाराष्ट्रात फक्त पुणे येथील सारस बागेत व भडगाव येथेच आहे.

मंदिराच्या देखभालीसाठी लगतच शेतजमिनीची व्यवस्था केलेली आहे. यासाठीच पटवर्धन करंदीकर, रहाळकर, पंडित इत्यादी सरदार पेशव्यांना नेमले होते. पूर्वीच्या काळी बारमाही वाहणारी गिरणा नदी व त्यावरील हे गणेशमंदिर पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. आजदेखील शहरातील व्यापारी व नागरिकांची दिवसाची सुरुवात या गणेश दर्शनाने होते. या मंदिराची देखरेख करण्याची जबाबदारी त्याकाळी पटवर्धन कुटुंबावर होती.

मूर्तीची साग्रसंगीत पूजा, मंदिराची देखभाल व विविध धार्मिक उत्सव साजरे करणे ही जबाबदारी या परिवारावर होती. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व मंदिर देखभालीच्या खर्चासाठी सुपीक शेतजमीन होती. गावाच्या एका बाजूस गिरणा नदीच्या काठावरील हे मंदिर परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला येथे आजदेखील पूजाअर्चा होते व दिवसभर गावातील गणेश भक्त दर्शना स येतात,परिसरातील नागरिकांचे हे जागृत देवस्थान आहे.

फोटो — भङगाव येथील पेशवेकालीन गणेश मंदीर व रिद्धी सिद्धी य्राप्त गणेश मुर्ती.

Leave A Reply

Your email address will not be published.