बोदवड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा !

0

बोदवड – तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुर्णपणे हिरावून घेतलेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची पिके व हंगाम उध्वस्त होऊन शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.त्यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी बोदवडातून होत आहे.

यंदा तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या हाती आलेला संपुर्ण हंगाम मातीतच गेलेला आहे. या परतीच्या पावसाने काढणीस आलेले ज्वारी,कापुस,मका कांदा, भुईमूग सोयाबीन,पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यात कडधान्य उडीद,मूग पुर्णपणे मातीत सडून नष्ट झाले असून ज्वारी व मका काढणी अगोदर व पश्चात कणसांवर दाण्यांवर अंकुर फुटून येणारे पीक सडून संपलेले आहे.पांढरे सोनं म्हणून गणले जाणा-या कापसाच्या पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने शेतातच कापुस पिवळा व लाल झाल्याने रोगग्रस्त होऊन जमिनीवर गळून पडला आहे.एकदंरीत तालुक्यातील संपुर्ण शेतकरी झालेल्या अतोनात नुकसानीमुळे हवालदिल झाले असून आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत.

त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोदवड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मुक्ताईनगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांचा समर्थकांनी केली आहे. निवेदन देतांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.उध्दव पाटील,नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक दिपक झांबड,मनुरचे शिवाजी ढोले,नगरसेवक डॉ.सुधीर पाटील,इंजिनिअर विजय पालवे,गजानन खोडके,विरेंद्रसिंग पाटील,यांसह वरिल सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.