फुले मार्केटमध्ये जागा देण्यास आयुक्तांचा नकार

0
मनपा समोर हॉकर्सचे ठिय्या आंदोलन
जळगाव- शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने मनपाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे
 हॉकर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. आखणी करून हॉकर्सला  त्याच ठिकाणी जागा द्यावी या मागणीसाठी फुले मार्केट हाकर्स संघटनेकडून मनपा परिसरात  बुधवारी  ठिय्या  आंदोलन करण्यात आले.  दरम्यान, नो हॉकर्स झोन असल्याने फुले मार्केटची जागा देता येणार नाही, असे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी सांगितले.
आयुक्तांना निवेदन
फुले मार्केटमधील हॉकर्स कारवाई सुरू झाली आहे. सततच्या कारवाईमुळे हतबल झालेल्या हॉकर्सने फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियनचे अध्यक्ष नंदू पाटील यांच्या  नेतृत्वात महानगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त डॉ. टेकाळे यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जितेंद्र वाणी, मनिष चौधरी, राजेंद्र नन्नवरे,  रविंद्र चौधरी, आकाश पाटील, ताज मोहम्मद शेख, शत्रुघ्न सपकाळे, सचिन वानखेडे, शेखर वाणी, प्रमोद चौधरी, कन्हैय्या गवळी आदी उपस्थित होते.
जुन्या नगरपालिकेच्या जागेची हॉकर्सकडून मागणी
हॉकर्स संघटनेने फुले मार्केटसमोरील जुन्या नगरपालिकेच्या जागेची मागणी केली होती. परंतु त्या जागेवर पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाला  पार्कींगच्या माध्यमातून जेवढे उत्पन्न मिळते. त्यापेक्षा जास्त उत्पन्न हॉकर्सला जागा दिल्यास मिळेल असेही हॉकर्सच्यावतीने सांगण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांकडे फुले मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय केला जाईल. नियम  मोडणार्‍या हॉकर्सवर पालिकेने कारवाई करावी अशी विनंती केली. परंतु आयुक्तांनी फुले मार्केटमध्ये जागा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तीच जागा हवी असेल तर  सर्वपक्षीयांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.