फडणवीसांचे ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर सूचक विधान…म्हणाले

0

औरंगाबाद । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. आजच्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र भल्या पहाटे शपथ घेतलेले हे सरकार अल्पजीवी ठरले होते. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या सरकारबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पहाटेच्या शपथविधीबाबत विचारण्यात आले तेव्हा फडणवीस म्हणाले की, आता ज्यावेळेस सरकार पाहायला मिळेल तेव्हा ते पहाटेचे सरकार पाहावे लागणार नाही तर योग्य वेळेचे सरकार पाहायला मिळेल. दरम्यान, त्या अल्पकालीन सरकारबाबत एक पुस्तक लिहित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार चार वर्ष नाही आणखी २० वर्ष हे सरकार चालवू, असं विधान केलं होतं. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी, त्यांना जनतेने निवडून दिलेले नाहीये, हे त्यांनाही माहितीये. हे बेईमानी करुन आलेले सरकार आहे. त्यामुळं हे सरकार किती काळ चालेल याबाबत मी भाष्य करणार नाही, ते आपोआप कळेल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.