प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  

येथील कोटेचा महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना जळगाव येथे आयोजित समारंभात जीवनगौरव पुरस्कार 2021 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डोक्यावर पगडी, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

जळगाव येथील किड्स गुरुकुल स्कूल जयनगर येथे राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना, गौरी ग्रुप यांच्या वतीने आयोजित समारंभात खासदार उमेश पाटील, माजी आमदार मनीष जैन ललवाणी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, केळी तज्ज्ञ के.बी. पाटील, काँग्रेसचे दिलीपसिंह पाटील, राजपूत करणी सेनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, सुरेश पाटील, सिंगल वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश वाघ, खान्देश कुणबी पाटील वधुवर सुचक केंद्राचे अध्यक्ष सुमित पाटील, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ, किड्स गुरुकुल स्कूलचे संचालक आदेश ललवाणी, ज्ञानेश्वर वाघ यांच्या उपस्थितीत प्रा.डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला. डॉ. ललवाणी यांचा परिचय बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन अय्याज मोहसिन यांनी केले. माजी आमदार मनिष जैन यांनी माझे मोठे भाऊ यांना माझ्याच उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येत असल्याबाबत अभिमान वाटत असल्याचे नमुद केले.

प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांनी आपल्या संपूर्ण सेवा कालावधीत अध्ययन-अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडितपणे कार्य केले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धडे सुद्धा त्यांनी दिले. त्याचा परिणाम म्हणून आज त्यांचे विद्यार्थी देश-परदेशात मोठमोठ्या पदांवर कार्य करीत असून अनेक विद्यार्थी शासकीय सेवा, गृहोद्योग, नानाविध व्यवसाय सांभाळत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात कौतुक म्हणून गेल्याच आठवड्यात त्यांच्या ‘घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यात आपल्या 32 वर्षांच्या सेवा कालावधीतील निवडक व प्रतिनिधिक 32 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांच्या मातोश्री ताराबाई ललवाणी व चिरंजीव स्वप्निल ललवाणी यांच्या निधनाने त्यांच्या आयुष्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर सावरता सावरता समाजासाठी काय करता येईल या हेतूने त्यांनी कुऱ्हे पानाचे गावालगत स्वर्गीय स्वप्नील स्मृती गोकुल ग्रामचा शुभारंभ केला आहे. शैक्षणिक सेवा कालावधीत अविरतपणे कार्यरत असणारे प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळातही स्वतःला सामाजिक सेवेत झोकून दिले आहे. त्यांनी अनेक गोशाळांना मदत, थंडीच्या दिवसात कुडकुडणाऱ्या रस्त्यावर झोपलेल्यांना मध्यरात्री पांघरुण, दुर्गम पाड्यावर मदत, महावविद्यालयांमध्ये पारितोषिके, पुस्तके भेट, तसेच ग्रंथालयांमध्ये अनेक ग्रंथ, कोटेचा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी पतपेढीची स्थापना, अविरतपणे १६ वर्ष प्रसिध्द कोटेचा व्याख्यानमालेची सर्व जबाबदारी, गरजुंना आर्थिक मदत, जैन समाजासाठी धार्मिक यात्रेचे आयोजन, भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातुन सामाजिक उपक्रम, बोधपर व्याख्यानांचे आयोजन, या त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला.

या आधी त्यांना  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला आहे. तसेच ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे ज्ञानरत्न पुरस्कार, बियाणी शैक्षणिक संस्थातर्फेही आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले आहे. त्याबद्दल  त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.