पेणमध्ये भाजपला न भरून निघणारे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज पेणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम रायगड जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत आगरी समाज हॉल येथे पार पडला.

गेले काही महीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये वाढत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावांत खासदार सुनिल तटकरे हे भाजप आणि शिवसेनेला मोठे राजकीय धक्क्यांवर धक्के देत आहेत. आज पेण तालुक्यातही याची झलक पहायला मिळाली. आज पेणमध्ये भाजपच्या काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार आणि नेते यांच्या कार्यपद्धतीवर टिका करत भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादित प्रवेश केला.

यावेळी प्रामुख्याने शेकापचे नेते अनंत ढेणे, शेकापचे जेष्ठ नेते प्रभाकर लांगी कोप्रोली ग्रामपंचायतीचे सरपंच विकास पाटील, उर्नोली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिभा पाटील, तरणखोप ग्रामपंचायत सरपंच अभिजित पाटील, हमरापूर ग्रामपंचायत सरपंच प्रदीप म्हात्रे, भाजपचे ऍड विकास म्हात्रे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच भारतीय जनता पक्ष पेण तालुक्यामध्ये गेली ३० वर्ष कार्य करणारे आणि माजी तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील यांनीही त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी गंगाधर पाटील म्हणाले की, मी गेली ३० वर्षे भाजपचे निष्ठेने काम केले, मतदारसंघात निवडणुकी आधी ३५८ बूथ मी मजबूत केले. माझे कार्य पाहुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपला जाहीर केली आणि आज या पेणमध्ये भाजपाचा आमदार आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी आज जाहीर सभेत सांगितले की, पेण तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला कोणताही राजकीय हेतू नसून तटकरे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पेण मतदार संघाची आमदार पदाची निवडणूक लढणार नसून राष्टवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जो उमेदवार ठरवतील तोच उमेदवार या पेण विधानसभा मतदार संघाचा आमदार असेल असे जाहीर केले. राष्टवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान ठेवला जातो असे सांगून गंगाधर पाटील यांना रायगड जिल्हा सरचिटणीस आणि ऍड विकास म्हात्रे यांना रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचे जाहिर केले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यानी आता राष्टवादी कॉंग्रेसपक्ष वाढीसाठी कामाला लागण्याचे आवाहनही खा. तटकरे यांनी यावेळी केले. तर आगामी काळात निवडणुकीच्या तोंडावर पेण तालुक्यातील भाजपला मोठा धक्का ही देण्याच्या तयारीत आम्ही आहोत अजुन काही नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सुचोवात खा. तटकरे यांनी या सभेत केले.

खासदार सुनील तटकरे यांनी पेण तालुक्याला विविध प्रकारच्या माध्यमातून निधी वापरून विकासात्मक चालना देण्याची ग्वाही केली. त्याचप्रमाणे खारेपाट भागातील पाणी प्रश्न आणि मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाठपुरावा सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी घोषणा केली. पेण शहराचे नियोजन करून विकासाच्या कामांना चालना देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हेटवणे धरणाचे पाणी सर्वप्रथम स्थानिक शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू कंपनी मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणार, बोरी शिर्की रस्त्याचे काम पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मंजूर करून घेतले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून पेण तालुक्याचा विकास साधणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना खा.तटकरे म्हणाले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील निवडणुकी करीता पूर्वी जे आरक्षण होते तेच आरक्षण आभाधित असून केंद्र सरकारने राज्यांना आरक्षणाबाबत जेव्हढे अधिकार दिले आहेत त्यापेक्षाही जास्त आरक्षण राज्य शासनाने दिले असल्याचे सांगितले.

या मेळाव्याला खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, नगरसेवीका वसुधा पाटील, जगन म्हात्रे, विकास पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, शहर उपाध्यक्ष विशाल बाफणा, बंडु पाटील, ऍड. मंगेश नेने, वडखळ सरपंच राजेश मोकल, मळेकर सरपंच शरद पाटील, उद्योजक अनिल म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.