पेणमध्ये पाहायला मिळाला आगळावेगळा कलाविष्कार

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पेण हे कलेच माहेर घर आहे. येथे अनेक कलाकार आपली कला जोपासून आहेत. आपल्याप्रमाणेच राज्यातील इतर मूर्तिकारांना आपली कला सादर करण्यासाठी पेणमधील श्री गणेश मित्रमंडळ कुंभार आळी आणि येथील गणपती कारखानदारांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील गुरव आळी येथील मूर्तिकार मृगज कुंभार यांची मूर्ती सरस ठरुन या मुर्तीकाराने प्रथम क्रमांक पटकावला. तर पेण मधील नितीन पेडणेकर  याने द्वितीय आणि ठाणे येथील आशिष लिहे या मुर्तीकाराने तृतीय क्रमांक पटकावला असल्याचे स्पर्धेचे परीक्षक विशाल शिंदे आणि योगेश निखारे यांनी जाहीर केले.

उत्कृष्ट मूर्तिकाम, सुबक डोळ्यांची आखणी, विविध प्रकारचे संदेश देणाऱ्या मूर्ती, मोहून टाकणारे रंगकाम अशा प्रकारची वाखाणण्याजोगी कला या प्रत्येक मूर्तीमध्ये दिसत असल्याने परिक्षकांमध्ये सुद्धा बक्षीसपात्र मूर्ती निवडताना पेच निर्माण झाला होता. मात्र जिथे स्पर्धा आहे तिथे निवड करणे क्रमप्राप्त असल्याने प्रथम क्रमांक मूर्तिकार मृगज कुंभार (पेण) यांच्या राजेशाही सोफा या मूर्तीला, द्वितीय क्रमांक नितीन पेडणेकर (पेण) यांच्या शेषनाग या मूर्तीला, तर तृतीय क्रमांक आकाश लिहे (ठाणे) यांच्या राजेशाही खुर्ची या मूर्तीला देऊन गौरविण्यात आले.तर शैलेश लोके – ( परेल ),केतन चिरनेरकर – ( अलिबाग ),विवेक देशमुख – ( पेण ),सुरज म्हात्रे – (रोडे काश्मीरे पेण ),वासुदेव पाटील – ( भिवंडी ),स्वराज वांद्रे( पेण ),विश्वजित पाटील – ( पेण ),आशिष कार्लेकर – ( पेण ),मयूर झिंगडे – ( परेल ),राज म्हात्रे – ( तरणखोप पेण ) या दहा मूर्तिकारांना उत्तेजनार्थ बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रदर्शनाला पेण मधील माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, पालिकेचे बांधकाम सभापती राजा म्हात्रे,भाजपचे विनोद शहा,आरटीओ अधिकारी मंगेश नाईक यांसह राज्यातील विविध स्तरातील असंख्य नागरिकांनी आणि  कारखानदारांनी भेट दिली.

यावेळी या कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रितम पाटील, ऍड मंगेश नेने, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, युवा नेते हितेश पाटील, मनसे तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, काँग्रेस अध्यक्ष अशोक मोकल, युवा नेते ललित पाटील, का. रा. पाटील ,रामभाऊ गोरीवले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.