पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण (व्हिडीओ)

0

वाराणासी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी काशीची प्राचीनता, परंपरा, सभ्यता आणि परंपरेवर भाष्य केलं.

काशी नगरी ही अति प्राचीन आहे. या नगरीला इतिहास आहे. सभ्यता आहे. या नगरीत आल्यावर सर्वच लोक बंधनातून मुक्त होतात. या मातीत एक अलौकिक आणि अद्भूत ऊर्जा आहे, असं सांगतानाच इथे जेव्हा औरंगजेबाचा अत्याचार वाढतो, तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी या भूमीत छत्रपती शिवाजीच उभे ठाकतात, असे गौरवौद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

आक्रमकांनी या नगरीवर आक्रमण केलं. या नगरी उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाच्या अत्याचार आणि दहशतीची ही नगरी साक्षीदार आहे. औरंगजेबाने तलवारीच्या बळावर इथली सभ्यता बदलण्याचा प्रयत्न केला. कट्टरतेने इथली संस्कृती गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. इथे जेव्हा औरंगजेब असतो तेव्हा छत्रपती शिवाजीही निर्माण होतात. एखादा सालार मसूद येतो तेव्हा राजा सुहेलदेव सारखे वीर योद्धे आपल्या एकतेचं दर्शनही घडवतात, असं मोदींनी सांगितलं.

काशीत प्रवेश करणारा सर्व बंधनातून मुक्त होतो असं आपल्या पुराणात म्हटलं आहे. भगवान विश्वेश्वराचा आशीर्वाद, एक अलौकिक ऊर्जा इथे आल्यानंतर शरीरात संचारते. इथे आल्यावर केवळ बाबांचं दर्शन मिळत नाही, तर आपल्या इतिहासाची प्रचिती येते. आपल्या गौरवशाली इतिहासाचं दर्शन होतं. आपली प्राचीन परंपरा आपल्याला दिशा देत असल्याचं दिसून येतं, असं मोदी म्हणाले.

विश्वनाथ धाम हा केवळ एक नवा परिसर नाही. एक केवळ भव्य भवन नाही तर आपल्या सनातन संस्कृतीचं हे एक प्रतिक आहे. आपल्या आध्यात्मिक आत्माचं प्रतिक आहे. आपली प्राचीनता आणि परंपरेचं प्रतिक आहे. भारताच्या ऊर्जेचं आणि गतिशीलतेचंही हे प्रतिक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला. राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद यांच्यासह कित्येक स्वातंत्र्य सैनिकांची कर्म आणि जन्मभूमी काशीच होती. भारतेन्द्रू हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुन्शी प्रेमचंद, पंडित शिवशंकर आणि बिस्मिल्लाह खान आदी प्रतिभावंत याच भूमितील आहेत, असं सांगातनाच याच भूमीत भगवान गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग दिला. कबीरदासांसारखेही याच भूमीतील आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.