नेहरू युवा केंद्र उभारतय ‘कोविड योद्धा’ची फौज!

0
जळगाव, दि.२४ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असली तरीही नागरिक योग्य खबरदारी बाळगत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘कोविड योद्धा’ म्हणून कार्य करण्यास इच्छूक  असलेल्यांची फळी निर्माण करण्यात येत आहे. अवघ्या एका दिवसात जिल्ह्यातील १५० वर स्वयंसेवकांनी नोंदणी केल्याची माहिती नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध मागदर्शक सूचना आणि निर्देशांची देखील अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 नेहरू युवा केंद्राकडून तालुकास्तरावर जनजागृती
नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जिल्ह्यात ३५ स्वयंसेवक गेल्या महिन्याभरापासून कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करीत आहे. सोशल मिडिया ग्रुप तयार करणे, नागरिकांना मास्क तयार करायला प्रोत्साहित करणे व शिकवणे, नागरिकांकडून आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करून घेणे, मास्क, सॅनिटायझर वाटप करणे, जनजागृती करण्याचे काम करीत आहे. जिल्ह्यात अनेक सोशल मिडिया ग्रुपद्वारे हजारो नागरिकांना घरात राहण्याचे, योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
कोविड योद्धांची तयार होतेय फळी
कोरोनाचे रुग्ण वाढल्यास प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी अधिक स्वयंसेवकांची गरज भासणार आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे देखील जळगाव जिल्ह्यात कोविड योद्धा म्हणून कार्य करण्यास इच्छूक असलेल्यांची यादी तयार करण्यात येत आहे. एक गुगल फॉर्मद्वारे सर्व माहिती ऑनलाईन भरण्यात येत असून योग्य वेळी आवश्यकता भासल्यास स्वयंसेवकांना बोलाविण्यात येणार आहे. सर्व कोविड योद्धांना शासनाच्या igot आयगॉट प्रणालीद्वारे दिक्षा अँपवर कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अवघ्या दोन दिवसात जिल्ह्यात १५० वर स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे.
रक्तदात्यांची केली नोंदणी
जिल्ह्यात ठिकठिकाणी भरविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांचे आयोजन सध्या केले जात नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यात नागरिकांना ऐनवेळी रक्ताची गरज भासल्यास त्यांना रक्तदाता उपलब्ध व्हावे यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे रक्तदात्यांची ऑनलाईन यादी तयार करण्यात येत आहे. सर्व दात्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घेतले जात असल्याने ऐनवेळी कुणाला गरज भासल्यास त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला जाईल, अशी माहिती जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर यांनी दिली आहे.
‘डब्ल्यूएचओ’कडून प्रशिक्षण
नेहरू युवा केंद्राच्या जळगाव जिल्हयातील सर्व समन्वयकांना पंधरा दिवसापूर्वी डब्ल्यूएचओकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना कराव्यात, नागरिकांचे समुपदेशन कसे करावे याबाबत अडीच तास ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. डब्ल्यूएचओच्या ज्योती मोहिते यांनी सर्व समन्वयकांना आणि स्वयंसेवकांना सविस्तर माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.