निवडणूक खर्चात तफावत; मोहोळ, धंगेकर, कोल्हे, आढळरावांना नोटिसा

0

पुणे,लोकशाही न्युज नेटवर्क-

पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक खर्चात दुसऱ्या फेरीत तफावत आढळली आहे. त्यामुळे सर्वांना नोटिसा पाठवून, त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.
मोहोळ यांच्या वतीने खर्च 13 लाख सहा हजार 474 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शॅडो खर्चाशी पडताळणी केली असता प्रत्यक्षात 49 लाख 34 हजार 58 रुपये खर्च झाल्याची नोंद आढळली. त्यामुळे खर्चात 36 लाख 27 हजार 584 रुपयांची तफावत आढळली. त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र धंगेकर यांच्या खर्चात 11 लाख 67 हजार 709 रुपयांची तफावत आढळली आहे. निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्याबाबत पुणे मतदारसंघातील अन्य चार उमेदवारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आढळराव यांच्या खर्चाच्या तपासणीत शॅडो अहवालानुसार, 53 लाख 38 हजार 334 रुपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात 22 लाख 91 हजार 548 रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे 30 लाख 46 हजार 786 रुपयांचा खर्चाची तफावत आढळली. त्याशिवाय डॉ. अमोल कोल्हे यांनी 43 लाख 96 हजार 426 रुपयांचा खर्च झालेला असताना त्यापैकी केवळ 32 लाख 18 हजार 968 इतका खर्च दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात 11 लाख 77 हजार 458 रुपयांची तफावत आढळली आहे. शिरूरमधील बहुजन समाज पार्टीचे राहुल ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख,भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे यांच्यासह एकूण सहा जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.