धरणगाव ग्रामीण रुग्णालयात मुंबईहून आलेल्या दाम्पत्याच्या तपासणीला नकार!

0

धरणगाव (प्रतिनिधी) : देश विदेशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात, राज्यात शासकीय पातळीवर करोना विरुध्द लढा उभारला आहे. मात्र धरणगावातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरच करोनाने दहशत निर्माण केली आहे. दहशतीमुळे त्यांनी बाह्य रुग्णांना रुग्णालयात “नो एंट्री”  केली आहे. कुणी आलंच तर त्यांना दाराबाहेर थांबवून तेथेच त्यांची जुजबी तपासणी उरकण्यात येत असल्याची चर्चा आहे. शिवाय ग्रामीण भागात पुण्या मुंबईहून आलेले नागरिक तपासणीसाठी येत आहेत. मात्र, त्यांनाही तपासणी न करताच परत पाठविण्यात येत आहे. या बाबत नागरीकात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे असेच होत राहीले तर तालुक्यातील नागरीकांचेच आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यावर वरीष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव येथे मुंबईहून एक जोडपे आज सायंकाळी पाच वाजता आले. त्यांना तेथील पोलिस पाटलांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जावून आरोग्य तपासणी करुन यायला सांगितले होते. ते जोडपे रुग्णालयात आले असता येथील कर्मचाऱ्यांनी त्यास प्रथम धुडकावून लावले. गयावया केल्यावर त्यांना कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी या असा सल्ला देवून हुसकावून लावले. आलेलं जोडपं वैद्यकीय तपासणी करायला तयार होते. गावच्या पोलिस पाटलाने त्यांचे कर्तव्य पार पाडले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांचा कर्तव्याचा विसर पडला की त्यांच्यावर करोनाची दहशत बसलीय. म्हणून ते तपासणीला आलेल्या जोडप्याची तपासणी न करता त्यांना घरी जाण्याचा उपदेश केला.

जोडपे तपासणीविनाच गावी परतले आहे. यांना लागण नसेल व ते संशयती नसतील तर ठीक आहे. मात्र, ते जर संशयीत असतील तर हा केव्हढा मोठा अपराध ठरु शकतो. एक व्यक्तीकडून अनेकांकडे पसरणारा हा जीवघेणा आजार अनेकांना आपल्या मिठीत घेवू शकतो. या जोडप्याला हुसकावून लावण्यात आले तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी ही तेथे उपस्थित होते. याचाच अर्थ असा की त्यांचीही या हुसकावणीला मुक संमतीच होती असे म्हटले आहे.

जोडप्याला परतवून लावण्याचे काय कारण होते? याचा जबाब अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील. त्यांच्याकडे उपचारच नाहीत का ? रुग्णांना आत घेवू नये असे त्यांना आदेश आहेत का ? रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयात येवूच नये का ? त्यांच्याकडे सुविधा नाहीत का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, नगराध्यक्ष जीवाचे रान करत असतांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी रुग्णांना हुसकावून लावत असतील तर हे चिंताजनक आहे. येथील नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयात नवीन गाद्या, चादरी, औषधी देवून संभाव्य आजारासी लढायला रुग्णालय सज्ज केले आहे. मात्र अधिकारी, कर्मचारी रुग्णाला रुग्णालयातच येवू देत नसतील तर त्या सुविधांचा काय उपयोग. या बाबत संबधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व भविष्यात असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.