धक्कादायक: 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

0

 बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना सारख्या गंभीर महामारीच्या काळात नॉन कोविड शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. मात्र आता काही वेगळंच  वास्तव समोर आलं आहे. कोरोना काळात राज्यात गर्भपिशव्या काढण्याचं रॅकेट पुन्हा सक्रीय झालं आहे. मराठवाड्यात हे रॅकेट सुरू असलं तरी बीड जिल्हा या गोरखधंद्याचं केंद्र ठरलं आहे.

बीडच्या अनेक खासगी दवाखान्यांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. कारण लॉकडाऊन काळातल्या पंधरा महिन्यात तब्बल 651 महिलांची गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातल्या बहुतांश महिला या ऊसतोड कामगार आहेत. विशेष म्हणजे गर्भपिशवी काढायची असेल तर जिल्हा शल्यचिकित्सक किंवा शासकीय वैदयकीय अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाच्या डोळ्यासमोर कायदा धाब्यावर बसवून हा धंदा सर्रास सुरू आहे.

गेल्या चार-पाच वर्षापूर्वी गर्भपिशव्या काढणारं रॅकेट बीड जिल्ह्यात उघडकीस आलं होतं. त्यानंतर अनेक समित्या सरकारने नेमल्या, दौरे केले, पण अद्याप चौकशी अहवाल बाहेर आलेला नससल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

आतापर्यंत बीड जिल्हा रूग्णालयात कोरोना काळात केवळ 4 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर एकट्या बीड तालुक्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये तब्बल 189 गर्भपिशव्या काढण्यात आल्या आहेत. दरम्यान रुग्णाची तपासणी करूनच गर्भपिशव्या काढण्यासाठी परवानगी दिली जाते. तपासणीविना त्यांना परवानगी दिली जात नाही. तर गतवर्षीपेक्षा यंदाचा आकडा कमी असल्याचा दावा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात महिला मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आहेत. खाण्यापिण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर यामागे आरोग्याचं कारण देत असले तरी सुत्रांच्या माहितीनुसार गर्भपिशवी विक्रीमागे एक मोठं रॅकेट सक्रिय आहे. या गर्भपिशव्यांचा उपयोग खतनिर्मितीसाठी केला जात असल्याचा संशय आहे. आधीच लॉकडाऊनमुळे गोर-गरीबांचा रोजगार हिरावला गेलाय. त्यात सरकारी अनास्थेमुळे त्यांना आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे कळत-नकळत या ऊसतोड मजूर महिला पुन्हा या सापळ्यात अडकल्याचे चित्र दिसून आलं आहे. .

 

Leave A Reply

Your email address will not be published.