धक्कादायक : २०१९ मध्ये महाराष्ट्रात २८०८ शेतकऱ्यांची आत्महत्या !

0

मुंबई : राज्यात २०१९ मध्ये २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महसूल विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार,२०१८ मध्ये २ हजार ७६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती तर २०१९ मध्ये २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली.

२०१५ पासून महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हळहळू कमी होताना दिसत होते. फडणवीस सरकारच्या काळात २०१५ मध्ये ३ हजार २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या तर २०१६ मध्ये हा आकडा कमी होऊन ३ हजार ५२ वर आला. २०१७ मध्ये भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यावर्षी शेतकरी आत्महत्येची संख्या २ हजार ९१७ इतकी राहिली. २०१८ मध्येही हा आकडा २ हजार ७६१ पर्यंत खाली आला. मात्र, २०१९ मध्ये शेतकरी आत्महत्येची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.

२०१९ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अनेक संकटांचे होते. मराठवाड्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले तर पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा तडाखा बसला. ४ लाख हेक्टरमधील शेती उद्ध्वस्त झाली. पावसाळा संपल्यानंतर राज्याच्या अनेक भागांना अवकाळीचे संकटही झेलावे लागले. त्यात राज्यभरात ९३ लाख हेक्टरवरील शेतीला फटका बसला. हेच कारण शेतकरी आत्महत्या वाढण्याच्या मूळाशी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.