धक्कादायक.. सरकारी शाळेतील 26 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून एका शाळेतील 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील 26 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसरा, ठाकूरमुंडा, मयूरभंज येथील चमकापूर आदिवासी निवासी मुलींच्या शाळेतील 26 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित 15 विद्यार्थिनींचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना सरकारी शाळेच्या आवारात विलगीकरणात ठेवण्यात आले असून अधिकाऱ्यांकडून सातत्याने संपर्क साधला जात आहे.

करंजिया उपजिल्हा दंडाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख करत आहे. औषधे दिली जात असून रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. परिस्थिती आणखी बिघडल्यास आम्ही विद्यार्थ्यांना डीएचएच रुग्णालयात हलवू, असं म्हटलं आहे. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि शाळेचा परिसर दिवसातून दोनदा स्वच्छ केला जात आहे. COVID-19 सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे नमुने कोरोना व्हायरस चाचणीसाठी गोळा केले जातील. शाळेमध्ये 20 कर्मचारी सदस्यांसह एकूण 259 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर ते गुरुवारी आजारी पडले.

शाळा प्रशासनाने आजारी विद्यार्थ्यांची कोविड-19 चाचणी करून घेतली. कोरोना तपासणीत 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चाचणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तर इतर 15 विद्यार्थ्यांचे नमुने बारीपाडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

 

हे विद्यार्थी जिल्ह्यातील ठाकुरमुंडा ब्लॉकमधील चमकापूर निवासी हायस्कूलचे रहिवासी आहेत. या पार्श्वभूमीवर करंजियाचे उपजिल्हाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी वैद्यकीय पथकासह शनिवारी शाळेला भेट दिली. ‘आम्ही शाळेची स्वच्छता केली आहे. सर्व पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना शाळेत वेगळे करण्यात आले असून त्यांना औषधे दिली जात आहेत. डॉक्टरांचे पथक येथे असून आम्ही विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असं उपजिल्हाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.