धक्कादायक.. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरदेवानं संपवलं जीवन

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बीड  जिल्ह्यातील नित्रुड येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न केलेल्या एका तरुणानं सत्यनारायणाची पूजा संपताच शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जोडप्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सत्यनारायण पूजा केली. मात्र नवरदेवानं लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पांडुरंग डाके असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरदेवाने आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी तरुणानं आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आत्महत्येचं कारण शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे. बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील रहिवासी असणारे पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) हे शेती करत होते. त्यांचं शनिवारी (20 नोव्हेंबर) माजलगाव येथील मुलीसोबत थाटामाटात लग्न झालं होतं. आज सकाळी दहाच्या सुमारास नव्या नवरी-नवरदेवासाठी घरी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती.

लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात होणार असल्याने पांडुरंग आनंदित होता. मात्र सत्यनारायण झाल्यानंतर पाहुणे, ग्रामस्थांच्या पंगती बसलेल्या असताना पांडुरंग कोणालाही न सांगता थेट शेतात गेला. शेतात पांडुरंग याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  शेजारील एका शेतकऱ्याने ही घटना पाहताच पांडुरंगच्या घरी याची माहिती दिली.

माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला केला. पांडुरंगच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाला मुखाग्नी द्यावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.