धक्कादायक : गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांचा गोळीबार, पाल – रावेर रस्त्यावरील घटना

0

रावेर  : रात्रीच्या गस्तीवरील असलेल्या पोलिसांनी दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पाल – रावेर रस्त्यावर सहस्त्रलिंग गावालगतच्या सलीमच्या ढाब्याजवळ आज पहाटे घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, सातपुड्याच्या अतिदुर्गम डोंगरदऱ्यातून जाणार्‍या रावेर – पाल रस्त्यावर रावेर पोलीस  स्टेशनच्या कॅमेरा वाहनातून पोकॉ श्रीराम कंगणे, गृहरक्षक तालूका  समादेशक कांतीलाल तायडे, सुनील तडवी, अमित समर्थ हे गस्त घालत शेरीनाका मध्यप्रदेश सीमेवरील आंतरराज्यीय नाकाबंदीला भेट देत रावेरकडे परतीच्या मार्गाने प्रयाण केले.  दरम्यान, सहस्त्रलिंग गावालगतच्या वळणरस्त्यावरील सलीमचा  ढाबा येथे चहापाणी मिळते काय? यासाठी वाहनाच्या  खाली उतरून पोकॉ कांगणे व त्यांचे सहकारी चौकशी करीत

असतानाच पालकडून दोन मोटारसायकलवर चार जण येत असल्याचे त्यांना दिसले. तथापि, रात्रीच्या संचारबंदीत संशयास्पद स्थितीत कोण फिरत आहेत? यासंबंधी चौकशी करण्यासाठी त्यांनी मोटारसायकलस्वारांना हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोन्ही मोटारसायकलवरील दोघंही बंदुकधारी युवकांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलीसांचे वाहन व पोलीसांना रस्त्यात उभे असल्याचे पाहून पोलीसांना जीवे  मारण्याच्या उद्देशाने त्या युवकांनी ठासणीच्या बंदकीतून पोलीसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संशयित आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. हे विशेष. सदरची घटना  १० मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींनी युटर्न  घेवून पालकडे तर दुसर्‍या मोटारसायकलवरील आरोपींनी सहस्त्रलिंगकडे पोबारा केल्याने पाठलाग करणार्‍या पोलीसांच्या हाती अपयश आले. अंदाजे विशी ते पंचविशतील हे तरूण असण्याचा पोलीसांनी अंदाज वर्तवला आहे.

याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ३०७, ३५३, ३३७, आर्म अॅक्ट ३(२५) व ३४ अन्वये बंदुकीच्या दोन फैरी झाडून पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.