धक्कादायक : करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारत चीनच्याही पुढे

0

नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.त्यातच  देशात करोनाबाधित रुग्णसंख्या गुरुवारी १ लाख ६५ हजारांवर पोहोचली असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.  करोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकेडवारीनुसार, भारतात सध्या करोनाचे १ लाख ६५ हजार ३८६ रुग्ण आहेत. चीनच्या तुलनेत भारतात जवळपास दुप्पट करोनाबाधित रुग्ण आहेत. इतकंच नाही तर  भारतातील मृतांची संख्या ४७११ झाली असून चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये ४६३४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

जगभरात करोनाचा फैलाव झाला असून आतापर्यंत ५९ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर साडे तीन लाखांहून अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये अद्यापही करोनाने थैमान घातले असताना चीनमधील रुग्णसंख्या मात्र कमी होत असून गेल्या अनेक दिवसांत फार कमी प्रकरणे समोर आली आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून १७ लाख रुग्ण आहेत. करोनाबाधित रुग्णसंख्येत भारत नवव्या स्थानी असून भारताच्या आधी ब्राझिल, रशिया, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीचा क्रमांक आहे. चीन १४ व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे १०, ११ आणि १२ व्या क्रमांकावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.