सावध प्रतिक्रिया देत भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला

0

नवी दिल्ली –भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. तो प्रस्ताव भारताने सावध प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे नाकारला.

भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आल्याने दोन्ही देशांत तीन आठवड्यांपासून सीमेवर तणाव निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीनमधील सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. त्यावर भारताची प्रतिक्रिया देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव पुढे आले. सीमा मुद्‌द्‌यावर शांततामय तोडगा काढण्यासाठी आम्ही चीनच्या संपर्कात आहोत. आमच्यात चर्चा सुरू आहे, असे त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सूचित केले.

सीमेवरील तणावामुळे पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, चीनलगतच्या सीमेवर शांतता अबाधित ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. त्याचवेळी सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या निर्धारावर भारत ठाम आहे, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी याआधी काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भारताने तो स्पष्टपणे फेटाळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.