देशात गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच इतकी मंदी!

0

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषदेत टीका

जळगाव- देशात जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजक बुडाले आहेत. उच्चशिक्षित बरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. देश सर्वात तीव्र मंदी अनुभवत असून गेल्या 70 वर्षात देशात इतकी मंदीची लाट कधीच आली नाही, रिझर्व बँकेकडून कधीच पैसा उपलब्ध करण्यात आला नाही, असा आरोप  खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी व्यासपीठावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभार्इ गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष गफ्फार मलीक,माजी आ. अरुण पाटील, माजी आ. दिलीप सोनवणे,  महानगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, उमेश पाटील, डॉ. दिपक पाटील, राजेश पाटील,ऐश्वर्या राठोड, मंगला पाटील आदी उपस्थित होते.

संवाद यात्रेच्या निमित्ताने खा. सुप्रिया सुळे जळगावी आल्या होत्या. यावेळी त्यांनी बुधवारी संध्याकाळी 5.30 वा. पत्रकार परिषद घेतली. हिरव्या मिरची जास्त काळ घरात ठेवली तर लाल होते. मात्र सरकारने लाल मिरचीवर जीएसटी लागू केला आहे ही बाब हास्यास्पद असल्याचे सांगून याबाबत लढा देणार असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधकांनी 50 वर्षे संघर्ष केला आम्ही पाच वर्ष करु असे त्या म्हणाल्या. मुलांपेक्षा आम्ही मुली बऱ्या आम्ही संघर्ष करु पण तुम्हाला खाली मान घालायला लावणार नाही. वयोवृद्ध नेत्यांना आपल्या मुलांसाठी  इतरांकडे जोडे झिजवावे लागत आहेत, ही शरमेची बाब आहे.असे त्या पक्षांतराबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाल्या.

गिरीश महाजन व माझी परिक्षा

विधानसभेत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे खातेही उघडणार नाही, असे ना. महाजन म्हणाले होते. याबाबत बोलताना गिरीश महाजन हे त्यांची परिक्षा देत आहेत. मी माझी परीक्षा देत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच उमेदवारीबाबतचा निर्णय  पक्षाची समिती ठरविणार असून महिलांसाठी मागतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इव्हिएमचे मार्जींन न पटण्यासारखे

सत्ताधाऱ्यांचे उमेदवार जिंकून येणे समजू शकते पण इव्हिएम मशीन देत असलेले मार्जींन न पटण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.

अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न करा

खा. सुप्रिया सुळे  यांनी राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत माझी लढण्याची तयारी आहे तुमची आहे का? असा सवाल विचारत विरोधकांनी 50 वर्षे संघर्ष केला आपण पाच वर्षेही करु शकत नाही का? आपल्याकडे भाड्याने आणलेली माणसे नसून सच्चे कार्यकर्ते आहेत. अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल, असे कान फुंकले.

Leave A Reply

Your email address will not be published.