देशात कोरोनाच कहर सुरूच ; 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.  गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus 2nd Wave) कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. पुढील तीन आठवडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं म्हणत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे. सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम हे पाळावे लागतील. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर मिश्रा यांनी रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे तीन आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.