दुसर्‍या दिवशीही अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा सुरुच

0

जळगाव दि. 14-

महानगरपालिकेने चालविलेली जम्बो अतिक्रमण हटाव कारवाई दुसर्‍या दिवशी शुक्रवारी चालूच होती. शुक्रवारी सकाळी तहसिलदार कार्यालय परिसरातील दुकानांवर हातोडा चालवत प्रशासनाने दुकाने मोडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार आदींसह अधिकारी उपस्थित होते. शास्त्री टॉवरकडून सुरुवात करत पथकाने निलेश गारमेंट, समोरील मोठ्या दुकानांचे पक्के ओटे तोडण्यात आले. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील दुकानांच्या समोरील ओटे तोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेसमोरील टपरी हटविण्यात आली. प्रशासनाकडून अतिक्रमण हटवितांना कोणताही भेदभाव होत नसल्याचा निर्वाळा नागरिकांकडूनही देण्यात येत होता.
दुसर्‍या एका पथकाकडून शहर पोलीस ठाणे ते भिलपुरा चौकापर्यंत रस्त्यावर केलेले अतिक्रमित ओटे, शेड हटविण्यात आले. यावेळी भिलपुरा चौकात अतिक्रमण नसल्याचा निर्वाळा मनपा सुत्रांकडून देण्यात आला.
तिजोरी गल्लीत कुटुंबाचा विरोध
महापालिकेच्या एका पथकाकडून तिजोरी गल्लीत अतिक्रमित ओटे हटविण्यात येत होते. मराठा मटन हॉटेलचे शेड प्रशासनाकडून काढण्यात आल्यानंतर पुढे चंद्रकांत एंटरप्रायजेस जवळ रहिवास असलेल्या परिवाराने घराच्या पायर्‍या तोडण्यात मज्जाव केला. यावेळी महिला पोलीसाची मदत घेवून परिवारातील महिला व मुलींना समजावण्यात येवून अतिक्रमण हटविण्यात आले.
रेडक्रॉसजवळील भंगार सामान हटविला
महानगरपालिकेच्या एका पथकाकडून पांडे डेअरी चौक ते पुष्पलता बेंडाळे चौकातील अतिक्रमण तोडण्यात आले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील व नवीन बी.जे. मार्केट जवळील विकास दूध बुथ हटविण्यात आले. यावेळी नवीन बी.जे. मार्केट आवारातील भंगार विक्रेत्यांनी मांडलेला ठिय्या मोडण्यात आला. त्यांचे तेथील भंगार सामान, सामानाच्या पेट्या हटविण्यात आल्या.
प्रसाधनगृहात 35 पोते प्लॅस्टीक भंगार
बी.जे. मार्केटमधील रेडक्रॉसच्या समोरील प्रसाधन गृहातील भंगारचे पोते असल्याचे प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीवरून अंदाजे प्लॅस्टीक भंगार असलेले 35 पोते
संबंधित महिलेला सांगून काढून टाकण्यात आले. यावेळी भंगार मोजण्याचा खांबही तोडून पालिकेकडून जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रकारच्या भंगारने सर्वच अवाक झाले. मनपाकडून प्रसाधन गृहाचे लोखंडी गेट सिल करण्यात आले. सदर कारवाई होत असताना उपायुक्त चंद्रकांत खोसे थांबून होते. यावेळी नगरसचिव सुभाष मराठे आदी मनपा अधिकारी उपस्थित होते.
रेडक्रॉसचा नवीन ओटाही सोडला नाही
जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरुन वाहत येणार्‍या गटारावर काल गुरुवारीच रेडक्रॉसकडून ओटा बांधण्यात आला होता. तो ओटाही महानगरपालिकेकडून तोडण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना कळविण्यात आले असता त्यांनी माझ्या कारकिर्दीत जरी असला व अनधिकृत असेल तर पाडा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनाही आयुक्त चंद्रकांत डांगे यांचा फोन आला की योग्य ती कारवाई करा. तेथील गटार ग्राऊंड लेवललाच करायच्या सूचना अधिकार्‍यांना आयुक्तांनी दिल्या.
शनिवारचा बाजार नेहमीप्रमाणे
नवीन बी.जे. मार्केट परिसरात शनिवारचा आठवड्याचा बाजार भरविण्यात येतो. मात्र तो कायमस्वरुपी नसल्याने तो भरु देण्यात येणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले. मात्र मनपाच्या धडक कारवाईमुळे विक्रेते साशंक आहेत.
अतिक्रमणानंतर खुले भूखंड व बेसमेंटवर कारवाई- आयुक्त
शहर जोपर्यंत अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई सुरुच राहणार असल्याचे मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी स्पष्ट केले. अतिक्रमणानंतर खुले भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई किंवा त्याचा व्यवसायीक वापर त्याचप्रमाणे अपार्टमेंट खालील बेसमेंटकडे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील चारशे इमारतींखालील बेसमेंटचा वापर हा व्यवसायासाठी होत आहे त्याचप्रमाणे 350 खुल्या भूखंडांचा उपयोगही व्यवसायीकीसाठी होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे खुले भूखंड व बेसमेंटधारकांना नोटीस देण्यात येईल त्यानंतर सुनावणी होवून त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.