दुर्दैवी : पती-मुलाच्या आत्महत्त्येनंतर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू ; जळगावातील घटना

0

जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या आजारासाठी पैसे नसल्याने पिता पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शहरातील आदर्श नगरमध्ये घडली होती. दरम्यान, उपचारादरम्यान, पत्नीचा मृत्यू झाला आहे. यामुळे आदर्श नगरातील सोनार कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदर्श नगरातील प्लॉट क्रमांक १९० येथे दीपक रतीलाल सोनार (वय-६५), पत्नी श्रध्दा दीपक सोनार (वय-६०) आणि मुलगा परेश दीपक सोनार (वय-३५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गत दोन दिवसांपासून त्यांची पत्नी न्यूमोनिया झाल्यामुळे एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे दोन दिवसात दीपक सोनार यांचे जावाई रूपेश सोनार आणि मुलगी रूपाली सोनार यांनी दीड लाख रुपये रोख कॅश भरली होती. प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांना ५ लाख रुपये भरण्यासाठी सांगितले होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असल्याने नातेवाईकांकडून बोलले जात आहे. दुपारी मुलगी रूपाली यांनी वडील दीपक सोनार यांना घरी जाण्यास सांगितले होते.

सायंकाळी जावाई व मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आदर्शनगरातील घरी आले. वडील दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व भाऊ परेश दीपक सोनार (वय ३४) यांचे मृतदेह त्यांना आढळून आल्याने रूपालीने एकच आक्रोश केला. याबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आज सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

 

त्यातच आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल असलेल्या श्रध्दा सोनार यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  यामुळे आदर्श नगरातील सोनार कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.