दुपारी शपथ घेतात, अन्‌ रात्री मला फोन करतात: गिरीश महाजन

0

नाशिक – “आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही’ अशी शपथ राष्ट्रवादीला आता घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सध्या माझा निम्मा दिवस भाजप प्रवेशाची यादी पाहण्यातच जात आहे, असेही महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या माझ्याकडे 50च्या वर लोकांची यादी आहे, जे भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. माझा निम्मा दिवस ही यादी बघण्यातच जात आहे. माजी आमदारांसोबत आजी आमदारही या यादीत आहेत. सोबतच मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही, मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्येही नाही, असेही महाजनांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाजनादेश यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून ही यात्रा 7-8 जळगावला येणार आहे. तसेच नाशिकला या यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय मंत्री अमित शहा येतील, असेही ते म्हणाले. यावेळी नाशिकच्या पूरस्थितीबातत ते म्हणाले की, नाशिकमध्ये अतिवृष्टी सुरु असून प्रशासन सर्व काळजी घेत आहे. चांदोरी, सायखेडा तसेच काझीगडीवरील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वेळप्रसंगी आम्ही मिल्ट्रीलाही पाचारण करू, असे महाजन म्हणाले. तसेच जायकवाडी 100 टक्के भरेल असे वाटत आहे. गेल्या 3 दिवसांत 30 टीएमसी पाणी तिकडे सोडण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.