दहावी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

0

मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.  दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ११ जानेवारी रोजी पर्यंत मुदत होती. मात्र आता राज्य मंडळाने ही आवेदनपत्रे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्यात येणारी अडचणी लक्षात घेता हे अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

माध्यमिक शाळांना चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बॅंकेत शुल्क भरण्यासाठी एक फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट चार फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे. दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत ही आवेदनपत्रे भरायची आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

यावर्षी नव्याने फॉर्म नंबर 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्‍चित केला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता दिलेल्या कालावधीत आवेदनपत्रे भरू नयेत, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे. मार्च-2020 किंवा नोव्हेंबर-डिसेंबर 2020मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच 2021मध्ये श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरून परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा देता येणार नाही, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.