तळीराम-मद्यविक्रेत्यांसाठी खुशखबर! पर्यटनस्थळं, महामार्गालगतची दारुची दुकानं पुन्हा होणार सुरू

0

मुंबई । कोरोना संकटामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २०१६ पासून विविध निर्बंधांमुळे बंद असलेली मद्याची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत: पर्यटन स्थळे आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गांलगत असणाऱ्या मद्याच्या दुकानांचा समावेश आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने २०१६ साली लागू केलेल्या अंतर निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल २२०० मद्याची दुकाने बंद झाली होती. नंतरच्या काळात न्यायालयाने यासंदर्भातील नियम काहीसे शिथील केले. त्यामुळे यापैकी काही दुकाने सुरु झाली होती. मात्र, आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे उर्वरित २२०० पैकी १५०० दुकाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आले.

 

दरम्यान, आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोणता नवा वाद निर्माण होणार का, पाहावे लागेल. यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात मद्याची दुकाने आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली होती. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्यामुळे आतादेखील भाजप सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेणार का, हे पाहावे लागेल.

 

कोणत्या भागातील मद्याची दुकाने सुरु होणार?

१) सरकारच्या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद असलेली दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी

२) महापालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने

३) तर नगरपालिका हद्दीपासून 3 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने

४) दीड हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील मद्याची दुकानेही आता सुरु होतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.