…तर पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा

0

जालना : एकीकडे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे पुन्हा निर्बंध लागू करणार असल्याची मोठी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी दिली आहे. बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यामध्ये  पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात सगळं पुन्हा सुरू झालं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे निर्बंध लागू करणं ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही इच्छा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. इतकंच नाही तर लग्न कार्यात दोनशे नागरिकांची संख्याही कमी करणार असल्याचं टोपे यांनी म्हंटलं आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कोणत्या ठिकाणी आणि कोणते नियम लागू करण्यात येतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आरोग्य मंत्र्यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. मास्क वापरले जात नाहीत. त्यामुळं आपल्याला काही कडक पावलं टाकावीच लागतील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहेत. त्यामुळं तिथे जे निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लावावे लागतील असं राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्यानं राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.