ठेवणीतील गुपित अस्त्र काढायचेच तर विकासास्त्र काढा !

0

जळगाव महानगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यावर आली असतांना माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी महापालिकेतील आजी-माजी नगरसेवकांचे झोप उडविली आहे. या नगरसेवकांचे गुपित मुख्यमंत्र्याकडे असून त्यांनी ते गुपित बाहेर काढले तर हे सर्व नगरसेवक कारागृहात जातील. चुकीची कामे करणार्‍यांना धडा शिकवायचा असेल तर अशा प्रकारच्या गुपित अस्त्रांचा उपयोग करणे जरूरीचेच आहे. तथापि, अशा गुपित अस्त्रांमुळे चुकीचा पायडा पडायला नको, सार्वजनिक जीवनात काम करतांना अनावधानाने काही झाली तर त्या चुकीचा परिणाम त्यांच्या जीवनावर दिर्घकालीन काळासाठी होत असेल, तर सार्वजनिक कामे हात राखून करण्याकडे सर्वांचा कल राहिल ऐवढे मात्र निश्‍चित. गोरगरीब बेघरांना स्वतःची मालकी असलेल्या घराचा आसरा देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतर्फे घरकुल योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला. योजना निःसंशय चांगली होती. परंतु ती घरकुल योजना अंमलबजावणी करतांना याप्रकरणात पोलिसात तक्रार झाली. प्रकरण न्यायालयात गेले, न्यायालयाने नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिला. कोट्यावधी रूपयांचे नगरपालिकेचे नुकसान झाले म्हणून त्याची नुकसान भरपाई सर्व नगरसेवकाकडून वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर सर्व नगरसेवकांनी वरिष्ठ न्यायालयात अपील करून सुट देण्याची विनंती केली. त्या न्यायालयाने जो निकाल दिला. त्यानंतर नगरसेवकांकडून त्या निकालाची केलेली दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला असल्याने हे सर्व नगरसेवक गोत्यात आलेले दिसतात. ते गुपित मुख्यमंत्र्यांजवळ असून ते गुपित जर बाहेर काढले आणि पोलिसात हे प्रकरण गेले. तर त्यासर्व नगरसेवकांना अटक होवून ते सर्व कारागृहात जातील असा या गुपित अस्त्राचा अर्थ काढण्यात येत असल्याने सर्व शंभर आजी माजी घबराट निर्माण झाली.
जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, माजी महापौर प्रदिप रायसोनी, बांधकाम व्यवसायिक राजा मयूर, मेजर नाना वाणी यांना अटक होवून चार – साडेचार वर्ष त्यांना कारागृहात रहावे लागले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दरम्यानच्या काळात घरकुल घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून ते आतापर्यंत तब्बल एक तपापर्यंत विकासाच्या कामांना खिळ बसली आहे. जळगाव पालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत होवूनही दहा वर्ष झाली. तरी जळगावचा विकास कोसो दूर गेला. झपाट्याने प्रगतीपथावर जाणार्‍या जळगाव शहराच्या विकासाला खिळ बसली. जळगाव महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने कर्मचार्‍यांच्या पगारालाच पैसा नसल्याने तेथे विकास काय होणार ? रस्ते, पाणी, विज, आरोग्य आवश्यक सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. देशात नगरपालिकेच्या मालकीची १७ मजली इमारत असलेली एकमेव नगरपालिका म्हणून जळगावचा नावलौकीक झाला, शॉपींग कॉम्प्लेक्सचे शहर म्हणून जळगावची ओळख निर्माण झाली, शॉपींग कॉॅम्प्लेक्समधून उत्पन्न कसे मिळते आणि हे कॉम्प्लेक्स कशापध्दतीने बांधले जातात, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांनी जळगावला भेटी दिल्या. त्याचा अभ्यास करून नगरपालिकेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले. तथापि राजकीय गटबाजीचा फटका जळगाव नगरपालिकेला बसला आणि झपाट्याने विकसीत होत असलेल्या जळगाव शहराला जणू दृष्ट लागली. गटबाजीच्या राजकारणामुळे अनेक नगरसेवक कायद्याच्या कचाड्यात अडकले वास्तविक पाहता, जळगाव नगरपालिका सर्वसाधारण सभेत संबंधित ठराव झाल्यानंतर वेळीच शासनाने प्रतिबंध केला असता तर ही वेळ आली नसती, आणि राजकारण गुपित अस्त्र बाहेर काढण्याची संधीही विरोधकांना मिळाली नसती.
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे २० वर्षापूर्वी सेना-भाजपा युती शासनात मंत्री असतांना अनेक विकासकामांचे धाडसी निर्णय घेतले. तापी पाटबंधारे विकास महामंडळ ही त्यांचीच देण आहे. त्यांनी युतीशासनात त्यावेळी अर्थमंत्री, शिक्षणमंत्री आणि पाटबंधारे मंत्री ही मंत्रीपदे भूषविली आणि त्यांच्या सर्वच खात्याची लक्षणिय कारकिर्द राहिली. त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून सुध्दा त्यांनी आपला कार्यकाळ गाजविला. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सळो कि पळो केले. बेकायदेशिर कामांना बे्रक लावला, अनेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली, स्वतःचा असा एक वेगळा दबदबा एकनाथराव खडसेंनी निर्माण केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष आघाडीच्या शासनावर त्यांचा अंकुश होता. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीत प्रकृती ठिक नसतांना सुध्दा महाराष्ट्रात सर्वांधिक भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. या निवडणूकीत सेना भाजपची युती स्वतः तोडल्याची जाहिर कबुलीही दिली आणि शिवसेनेचा विरोध स्वतःवर ओढवून घेतला. जळगाव जिल्ह्यात ११ पैकी ६ भाजपचे आमदार निवडूण आले. ज्येष्ठते नुसार ते स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनले. तिथे राजकारण आडवे आले आणि त्यांना मुख्यमंंत्री जरी होता आले नसले तरी महसूल मंत्री, कृषीमंत्री सारखे तब्बल १२ खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. ऐवढ्या खात्याची जबाबदारी असतांना सुध्दा एकनाथराव खडसे यांच्या कामांचा धडाका चालू होता. त्यात अचानक पुण्याच्या भोसरी एमआयडीसीचे प्रकरण आडवे आले. त्यात त्यांना मंत्री पदाचा राजीनामा लागला. त्यातचं कुख्यात डॉन दाऊद यांच्या पत्नीशी संबंध असल्याचे कथित प्रकरण बाहेर आले. दरम्यान, दोन वर्षांचा कालावधी गेला. त्याचा परिणाम अनेक विकास कामांना खिळ बसली. महाराष्ट्राचा पर्यायाने जळगाव जिल्ह्याचा विकास ठप्प झाला. नाथाभाऊंना मानसिक त्रास व्हायचा तो झाला म्हणून ते म्हणाले सुरेशदादांशी माझी वैयक्तिक दुश्मनी नाही माझा लढा प्रवृत्तीशी आता अशाप्रकारे लढा देण्याची माझी मानसिकता नाही. त्यांच्या या वाक्यातच सर्व काही आले. तेव्हा गुपित अस्त्र काढायचे असेल तर विकासाचे अस्त्र काढा. यातून धडा घेण्यासारखे अनेक गोष्टी आहेत त्या घेतल्या पाहिजे ऐवढेच यानिमित्त आम्हाला सुचवावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.