ठाणे जिल्ह्यात ६२ हजार असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

असंघटीत कष्टकरी कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जात असून जिल्ह्यात आता पर्यंत ६२ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. या पोर्टवलर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त  कष्टकऱ्यांची नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिले.

कामगार विभागामार्फत ई-श्रम नोंदणीकरीता तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कामगार उपायुक्त संतोष भोसले, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल कुटे, सारीका राऊत, सरकारी कामगार अधिकारी दिपा भिसे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले तसेच नोंदणी कामी उत्तम काम करणाऱ्या सेवा केंद्रांना प्रमाणपत्राचे देखील वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर म्हणाले, जिल्ह्यातील असंघटीत कामगारांच्या नोंदणीसाठी आणि त्यांचा डेटाबेस तयार करण्याकरीता ई-श्रम पोर्टल उपयुक्त ठरणार असून या असंघटीत कष्टकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी ही नोंदणी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यासाठी सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) विशेष शिबिर घ्यावीत. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

महिला कामगारांची नोंदणी करताना आधारकार्डवरील लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे नाव यावरुन नोंदणीसाठी अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा अडचणी दूर करण्यासाठी विशेष शिबिर घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कामगार उपायुक्त श्री.भोसले यांनी ई-श्रम पोर्टल बाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नोंदणी झालेल्या असंघटीत कामगारांना युनिर्व्हसल अकाऊंट नंबर असलेले ई-श्रमकार्ड देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात आता पर्यंत ६२ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्याला  शिबीर घेण्याचा मानस असून वीट भट्टी, रेती बंदर याठिकाणी देखील विशेष शिबीर घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

नोंदणीसाठी असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारे वय १६ ते ५९ वर्ष या दरम्यानचे कामगार पात्र असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसलेले कामगार नोंदणी करु शकतात. शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगातील हे असंघटीत कामगार असणे आवश्यक आहे.  नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबूक, मोबाईल नंबर आवश्यक आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.