ज्येष्ठांकडून जगण्याची जिद्द शिकण्यासारखी: डॉ. मृण्मयी देशपांडे

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

“आयुष्याच्या संध्याकाळी काळजी करत बसण्यापेक्षा आनंदाने जगणारे ज्येष्ठ पाहिले की त्यांचा हेवा वाटतो.कोरोनाच्या आक्रमणात घरातील अनेक ज्येष्ठ नातेवाईक आपल्याला सोडून गेले.तरीही निराश न होता आलेल्या संकटांचा सामना करण्याची अनेक ज्येष्ठांची जिद्द युवा पिढीने शिकण्यासारखी आहे.”असे गौरवोद्गार डॉ. मृण्मयी विरेंद्र देशपांडे यांनी काढले.

शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखक अनंत केशव देशपांडे यांच्या ‘काळ्या ढगांच्या सोनेरी कडा’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. राजे संभाजी सभागृहात आयोजित केलेल्या सोहळ्यात यावेळी व्यासपीठावर  डॉ. पुष्पलता धुरी, अनंत देशपांडे, राजेश साबळे, नंदा कोकाटे, विरेंद्र देशपांडे ,वृषाली देशपांडे , माधवी पट्टेकर , भाग्यश्री नुलकर, संपादक अमोल सरतांडेल प्रकाशक प्रा.संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मृण्मयी देशपांडे म्हणाल्या,”जरा काही मनाविरुद्ध झाले की आजची तरुण पिढी निराश होते.त्याच वेळी अनेक वादळाना झेलून संकटांवर मात करून अनेक ज्येष्ठ आजही लढत आहेत.हे सर्वांनीच शिकण्यासारखे आहे.  लेखक अनंत देशपांडे यांचे आत्मचरित्र म्हणजे कितीही संकटे आली तरी विचलीत न होता संकटावर कशी मात करावी हे शिकता येणारे आहे.”

अध्यक्षपदी असलेल्या डॉ. पुष्पलता धुरी म्हणाल्या,”या आत्मचरित्रातून प्रत्येकाला शिकण्यासारखे आहे. निराशेतून बाहेर काढणारे हे पुस्तक आहे. अशी आत्मचरित्रे समाजाला दिशा देण्याचे काम करतात.”

“लहानपणी आई देवाघरी गेली. नंतर वडील गेले. अगदी एकाकी झालो. पण नातेवाईकांनी साथ दिली.वहिनीने मुलासारखा सांभाळ केला , म्हणूनच आज तुमच्यासमोर उभा आहे.” असे सांगून लेखक अनंत देशपांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” आज माझे वय चौऱ्याऐंशी आहे. या प्रवासात अनेक भलीबुरी माणसे भेटली. त्यांच्याकडून चांगले ते वेचले. जीवन सुंदर आहे हे मानून जे जे मिळत गेले ते आनंदाने स्वीकारले. तक्रार न करता लिहित राहिलो. समविचारी लोकांशी संपर्क वाढवीत राहिलो.त्यातून जगण्याला दिशा मिळाली.”

याप्रसंगी नामदेवराव टिकेकर,गोविंद झावरे,हरिश्चंद्र चाचड, सोनल खानोलकर,ज्योती गोसावी,सरिता दिघे,सूर्यकांत  भोसले,राजाभाऊ  करंगुटकर आणि वृषाली देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी नीलपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष राजेश साबळे ,उपाध्यक्ष नंदा कोकाटे , प्रकाशक प्रा.संतोष राणे , संपादक अमोल सरतांडेल , तसेच अनेक मान्यवरांची भाषणे झाली. भाग्यश्री नुलकर यांनी नेटके सूत्रसंचालन केले तर विरेंद्र देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.